चेन्नई, आयपीएल 2019 : रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धची महेंद्रसिंग धोनीची खेळी आठवल्यावर विराट कोहलीचा पडलेला चेहरा समोर येतोच... चेन्नईचे आघाडीचे फलंदाज झटपट माघारी पाठवून निर्धास्त असलेल्या कोहलीच्या हातून धोनीनं सामना कधी काढून नेला ते कुणालाही कळले नाही. पण, नशिबाचं नाणं फिरलं आणि चेन्नई सुपर किंग्सला अवघ्या एका धावेने हार पत्करावी लागली. पण, धोनीचं फॉर्मात परतणं हे त्याच्या चाहत्यांसाठी खूप मोठी गोष्ट आहे. याच धडाकेबाज धोनीच्या तडाख्यापासून वाचण्यासाठी सनरायझर्स हैदराबादने दोन हुकुमी एक्के बाहेर काढण्याची रणनीती आखली आहे.
चेन्नई आणि हैदराबाद यांच्यातील पहिल्या सामन्यात धोनीच्या संघाला पाच विकेट्सने पराभव पत्करावा लागला होता. त्या सामन्यात धोनी दुखापतीमुळे खेळला नव्हता आणि आजच्या सामन्यातही तो खेळेल याची शक्यता कमी आहे. पण, जर तो खेळल्यास त्याला रोखण्यासाठी हैदराबादचा संघ सज्ज आहे. धोनीनं बंगळुरूविरुद्ध नाबाद 84 धावांची खेळी केली होती. त्याने 48 चेंडूंत 5 चौकार आणि 7 षटकार ठोकले होते. पण, अखेरच्या चेंडूवर दोन धावांची गरज असताना चेन्नईचा शार्दूल ठाकूर धावबाद झाला.
यंदाच्या मोसमात धोनीनं 7 डावांत 314 धावा केल्या आहेत आणि त्याची सरासरी ही 104.66 इतकी आहे. चेन्नईकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत तो आघाडीवर आहे. पण, धोनी फिरकी गोलंदाजांचा सामना करताना अडखळत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे त्याला रोखण्यासाठी हैदराबाद रशीद खान आणि शाहबाज नदीम हे दोन एक्के काढणार आहेत. रशीदविरुद्ध धोनीला 22 चेंडूंत 14 धावा करता आल्या आहेत आणि तो एकवेळा बाद झाला आहे, तर नदीमविरुद्ध तो एकदा बाद झाला आहे.
केन विलियम्सन आजच्या सामन्याला मुकणारआयपीएलच्या गुणतालिकेत अव्वल चार संघांमध्ये स्थान पक्के करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या हैदराबाद संघाला धक्का बसला आहे. हैदराबाद मंगळवारी चेन्नईचा सामना करणार आहेत. या लढतीपूर्वी त्यांचा कर्णधार केन विलियम्सनने वैयक्तिक कारणास्तव मायदेशात परतण्याचा निर्णय घेतला आहे. आजीचे निधन झाल्यामुळे विलियम्सन मायदेशात परतला आहे आणि तो 27 एप्रिलला राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात परतण्याची शक्यता आहे. विलियम्सनच्या अनुपस्थितीत भुवनेश्वर कुमार हैदराबाद संघाचे नेतृत्व सांभाळणार आहे.