हैदराबाद, आयपीएल 2019 : सनरायझर्स हैदराबाद संघाने उत्तम सांघिक कामगिरी करताना रविवारी कोलकाता नाइट रायडर्सवर 9 विकेट राखून दणदणीत विजय मिळवला. डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेरअस्टो यांनी 131 धावांची सलामी देत हैदराबादचा विजय पक्का केला होता. या जोडीच्या विक्रमी कामगिरीच्या जोरावर कोलकाताने विजयासाठी ठेवलेले 160 धावांचे लक्ष्य हैदराबादने सहज पार केले. कोलकाताचा हा सलग पाचवा पराभव ठरला. वॉर्नरने 38 चेंडूंत 67 धावा केल्या, तर बेअरस्टो 43 चेंडूंत 80 धावा करून नाबाद राहिला.
ख्रिस लीन आणि रिंकु सिंग यांच्या संघर्षानंतरही कोलकाता नाइट रायडर्सला रविवारी आयपीएलच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 8 बाद 159 धावा करता आल्या. चांगल्या सुरुवातीनंतर सातत्याने पडत राहिलेल्या विकेट्समुळे कोलकाताला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. हैदराबादच्या गोलंदाजांनी त्यांच्यावरील जबाबदारी सक्षमपणे पार पाडली. कोलकाताचा हुकमी एक्का आंद्रे रसेल याला फलंदाजीची फार संधी मिळाली नाही, परंतु त्याने 15 धावा केल्या. रिंकुने 25 चेंडूंत 30 धावा केल्या, तर लीनने 47 चेंडूंत 51 धावा केल्या. त्यात 4 चौकार व 1 षटकाराचा समावेश होता.