हैदराबाद, आयपीएल 2019 : जॉनी बेअरस्टो आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या वादळी खेळीनंतर मोहम्मद नबीच्या फिरकीनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला शरणागती पत्करण्यास भाग पाडले. बेअरस्टो आणि वॉर्नर या दोघांनी शतकी खेळी करून सनरायझर्स हैदराबादला 20 षटकांत 2 बाद 231 धावांचा डोंगर उभा करून दिला. प्रत्युत्तरात बंगळुरूचे 6 फलंदाज 35 धावांवर माघारी परतले होते. नबीने 4 षटकांत 11 धावा देत 4 विकेट घेत बंगळुरूला मोठा धक्का दिला. हैदराबाद संघाने हा सामना 118 धावांनी जिंकला. बंगळुरूच्या संघाला सलग तिसऱ्या सामन्यात पराभवाचे तोंड पाहावे लागले. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करतना बंगळुरूचे धुरंधर अपयशी ठरले. बंगळुरुचा संपूर्ण संघ 113 धावांवर माघारी परतला.
बेअरस्टो आणि वॉर्नरच्या वादळी खेळीनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या गोलंदाजांचा पालापाचोळा केला. त्यांच्या फटकेबाजीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने 20 षटकांत 2 बाद 231 धावा चोपल्या. बेअरस्टोनं 56 चेंडूंत 12 चौकार व 7 षटकार खेचून 114 धावा केल्या, तर वॉर्नरने 55 चेंडूंत 5 चौकार व 5 षटकार खेचून नाबाद 100 धावा केल्या.
231 धावांचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला दुसऱ्याच षटकात धक्का बसला. हैदराबादच्या मोहम्मद नबीनं बंगळुरूचा सलामीवीर पार्थिव पटेलला मनीष पांडेकरवी झेलबाद केले. चौथ्या षटकात मोहम्मद नबीनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला दोन धक्के दिले. शिमरोन हेटमायर पाठोपाठ नबीने बंगळुरूच्या एबी डिव्हिलियर्सलाही माघारी पाठवले. संदीप शर्माने सातव्या षटकात बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीला बाद करत मोठा धक्का दिला. त्याच्या पुढच्याच चेंडूवर मोईन अली धावबाद झाला. बंगळुरूचा निम्मा संघ अवघ्या 30 धावांत माघारी परतला. नबीने आणखी एक धक्का दिला. त्याने शिवम दुबेला बाद करताना बंगळुरूची 6 बाद 35 धावा अशी दयनीय अवस्था केली. नबीने 4 षटकांत 11 धावा देत 4 फलंदाजांना माघारी पाठवले. त्याने पार्थिव पटेल, शिमरोन हेटमायर, एबी डिव्हिलियर्स आणि शिवम दुबे यांना बाद केले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या 10 षटकांत 6 बाद 44 धावा झाल्या होत्या.
प्रयास रे बर्मन आणि डी ग्रँडहोम यांनी सातव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करताना संघर्ष केला. पण, त्यांचा हा संघर्ष बंगळुरुला विजय मिळवून देण्यासाठी पुरेसा ठरला नाही. सिद्धार्थ कौलने बंगळुरुला धक्का दिला. प्रयास बर्मनला त्याने बाद केले. प्रयासने 24 चेंडूंत 19 धावा केल्या. बंगळुरूला हा सामना गमवावा लागला. डी ग्रँडहोमने 32 चेंडूंत 37 धावा केल्या.
Web Title: IPL 2019 SRH vs RCB: Sunrisers Hyderabad beat Royal Challengers Bangalore by 118 runs
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.