हैदराबाद, आयपीएल 2019 : जॉनी बेअरस्टो आणि डेव्हिड वॉर्नरच्या वादळी खेळीनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या गोलंदाजांचा पालापाचोळा केला. त्यांच्या फटकेबाजीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने 20 षटकांत 231 धावा चोपल्या. बेअरस्टोनं 56 चेंडूंत 12 चौकार व 7 षटकार खेचून 114 धावा केल्या, तर वॉर्नरने 55 चेंडूंत 5 चौकार व 5 षटकार खेचून नाबाद 100 धावा केल्या.
बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. जॉनी बेअरस्टो आणि डेव्हिड वॉर्नर यांनी हैदराबादला अपेक्षित सुरुवात करून दिली. मोईन अलीच्या पहिल्याच षटकात या जोडीनं 14 धावा काढल्या. डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांनी संघाला दमदार सुरुवात करून दिली. हैदराबादच्या सलामीवीरांनी पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलताना 6 षटकांत 59 धावा चोपल्या. या दोघांची ही आयपीएलमधील तिसरी अर्धशतकी भागीदारी ठरली. वॉर्नर - बेअरस्टो ही आंतरराष्ट्रीय अनुभव असलेली जोडी समोर असूनही 16 वर्षीय प्रयास रे बर्मनने चोख गोलंदाजी केली. त्यानं पहिल्याच षटकात केवळ 6 धावा दिल्या. बेअरस्टोनं अर्धशतक पूर्ण करताना संघालाही शतकी पल्ला पार करून दिला. हैदराबादने 10 षटकांत बिनबाद 105 धावा केल्या.