जयपूर, आयपीएल 2019 : इंडियन प्रीमिअर लीगच्या 12व्या मोसमातील प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राखण्यासाठी राजस्थान रॉयल्स संघाला उर्वरित 6 सामने जिंकावे लागणार आहेत. राजस्थान रॉयल्सचा आज घरच्या मैदानावर मुंबई इंडियन्सविरुद्ध सामना होणार आहे. या महत्त्वपूर्ण सामन्यापूर्वी राजस्थान रॉयल्सने आपल्या संघाचे नेतृत्वात बदल करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राजस्थानने अजिंक्य रहाणेकडून नेतृत्वाची जबाबदारी काढून घेताना संघाची धुरा स्टीव्हन स्मिथकडे सोपवली आहे. राजस्थान रॉयल्सने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही घोषणा केली आहे.
अजिंक्य रहाणेने गत हंगामात नेतृत्वकौशल्याच्या जोरावर संघाला प्ले ऑफपर्यंत नेले होते. परंतु यंदाच्या हंगामात त्याला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्यामुळे संघाला पुन्हा विजयपथावर आणण्यासाठी नवीन कर्णधार नियुक्त करण्याची गरज असल्याचे संघाकडून सांगण्यात आले. त्यामुळे ही जबाबदारी स्मिथकडे सोपवण्यात येणार आहे. रहाणे हा संघाचा अविभाज्य घटक असणार आहे. राजस्थान रॉयल्सचे मुख्य प्रशिक्षक झुबीन भारूचा यांनी सांगितले की,''अजिंक्य हा आमचा नेहमीच महत्त्वाच खेळाडू राहणार आहे. 2018च्या आयपीएलमध्ये अनेक आव्हानांचा सामना करून त्याने संघाला प्ले ऑफ पर्यंत मजल मारून दिली होती. तो आताही संघाचा अविभाज्य घटक आहे आणि स्मिथला त्याची मदत होईल.''