बंगळुरू, आयपीएल 2019 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्यात 'No Ball' प्रकरण चांगलेच गाजले. मुंबई इंडियन्सच्या लसिथ मलिंगाने टाकलेला अखेरचा चेडू नो बॉल असूनही पंचांना तो दिसला नाही आणि त्यावर बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीनं तीव्र संताप व्यक्त केला. बंगळुरूला हा सामना 6 धावांनी गमवावा लागला. या सामन्यात युवराज सिंगची बॅट पुन्हा तळपलेली पाहायला मिळाली आणि त्यानं बंगळुरूच्या युझवेंद्र चहलच्या एका षटकात तीन षटकार खेचले. युवीच्या या फटकेबाजीमुळे आज माझा स्टुअर्ट ब्रॉड होतोय की काय, असे वाटू लागल्याची प्रतिक्रीया चहलनं दिली. चहलच्या या प्रतिक्रियेवर इंग्लंडचा गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडनंही प्रत्युत्तर दिले.
युवीनं 14व्या षटकात चहलच्या गोलंदाजीवर सलग तीन षटकार खेचले. चौथ्या चेंडूवरही युवीनं मोठा फटका मारला, परंतु सीमारेषेनजीक असलेल्या मोहम्मद सिराजने झेल टिपला आणि युवीला माघारी पाठवले. युवीनं 12 चेंडूंत 23 धावा केल्या. युवी बाद होताच चहलनं सुटकेचा निश्वास टाकला. 2007 च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत युवीनं इंग्लंडच्या ब्रॉडच्या सहा चेंडूंवर सहा षटकार ठोकले होते. त्याची पुनरावृत्ती युवी आज आपल्या गोलंदाजीवर करतो की काय, अशी भीती चहलला वाटू लागली होती.
युवीनं 19 सप्टेंबर 2007 रोजी इंग्लंडविरुद्ध झालेल्या सामन्यात सहा चेंडूत सहा षटकार ठोकले होते. या सामन्यात युवराजनं 16 चेंडूंमध्ये 58 धावांची तुफानी खेळी साकारली. सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेचा व्हिडीओ बीसीसीआयनं इंस्टाग्रामवर शेअर केला. चहलने मस्करीत दिलेल्या प्रतिक्रीयेवर ब्रॉडनं प्रत्युत्तर दिले. तो म्हणाला,''10 वर्षांनंतर कसोटीत 437 विकेट्स घेण्याचा अभिमान मला वाटतोय, तसाच चहललाही वाटेल, अशी आशा करतो.''