जयपूर, आयपीएल २०१९ : मनीष पांडे आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या दमदार खेळींच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादला 160 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली. राजस्थानकडून श्रेयस गोपाळ, वरुण आरोन, जयजेव उनाडकट आणि ओशान थॉमस यांनी प्रत्येकी दोन विकेट्स मिळवल्या.
राजस्थानने नाणेफेक जिंकून हैदराबादला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. केन विल्यमसन आणि डेव्हिड वॉर्नर यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. या दोघांनी २८ धावांची सलामी दिली. केन यावेळी १३ धावा करून बाद झाला, हैदराबादसाठी हा पहिला धक्का होता. त्यानंतर वॉर्नर आणि मनीष पांडे यांची चांगलीच जोडी जमली.
वॉर्नर आणि पांडे या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी ७५ धावांची भागीदारी रचली. वॉर्नरच्या रुपात हैदराबादला दुसरा धक्का बसला. वॉर्नरने ३७ धावांची खेळी साकारली. वॉर्नर बाद झाल्यावर पांडेने काही काळ फटकेबाजी केली, पण त्याला शतकाची वेस ओलांडता आली नाही. पांडेने ३६ चेंडूंत ९ चौकारांच्या जोरावर ६१ धावांची धडाकेबाज खेळी साकारली.