मुंबई, आयपीएल 2019 : मुंबई इंडियन्सकडून पदार्पणाच्या सामन्यात युवराज सिंगने दमदार फटकेबाजी केली, परंतु त्याची अर्धशतकी खेळी संघाचा पराभव टाळू शकली नाही. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सला 37 धावांनी हार मानावी लागली. दिल्लीच्या 213 धावांच्या प्रत्युत्तरात मुंबईला 176 धावा करता आल्या. पण, या सामन्यात युवीनं 35 चेंडूंत 53 धावा करताना झोकात पुनरागमन केले. मुंबई इंडियन्सकडून प्रथमच खेळतानाचा अनुभव आणि भविष्याच्या वाटचालीबाबत युवीनं सामन्यानंतर सांगितले.रिषभ पंतच्या खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकांत 213 धावा चोपल्या आणि मुंबई इंडियन्सवर 37 धावांनी विजय मिळवला. पंतने 27 चेंडूंत 78 धावांची धमाकेदार खेळी केली. पंतने या खेळीत 7 चौकार व 7 षटकारांची आतषबाजी केली. त्याला प्रत्युत्तर देताना मुंबईकडून युवराजने 53 धावांची खेळी केली, त्याला कृणाल पांड्याने 32 धावा करताना साथ दिली, परंतु दोघेही मुंबईचा पराभव टाळू शकले नाही. युवराजला आयपीएलच्या मागील हंगामात समाधानकारक कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळेच 2019च्या लिलावात त्याला संघात घेण्यात कोणत्याच संघाने फार रस दाखवला नाही. पहिल्या टप्प्यात अनसोल्ड राहिल्यानंतर अखेरच्या टप्प्यात युवीला 1 कोटीच्या मुळ किमतीत मुंबई इंडियन्सने आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. युवीनंही पहिल्याच सामन्यात अर्धशतक झळकावून आपली निवड योग्य असल्याचे सिद्ध केले.तो म्हणाला,''मागील दोन वर्ष चढ उतारांचे होते. मला क्रिकेट खेळायला आवडते आणि त्याचा मनमुराद आस्वाद मी घेतो, म्हणून मी या खेळ खेळतो. पण मागील दोन वर्षांत मला साजेशी कामगिरी करता आलेली नव्हती. पण, जोपर्यंत क्रिकेट खेळण्याचा आनंद मिळतोय, तोपर्यंत खेळत राहिन. जेव्हा वाटेल की थांबायला हवं, तेव्हा नक्की निवृत्ती जाहीर करीन.''''निवृत्तीविषयी सचिन तेंडुलकरशीही मी चर्चा केली आहे. 37 वर्षांचा असताना त्यालाही निवृत्तीच्या प्रश्नांच्या भडीमाराचा सामना करावा लागला होता आणि त्यामुळेच मी त्याचा सल्ला घेतला. त्याच्याशी चर्चा केल्यानंतर माझ्यावरील दडपण कमी झाले,'' असेही युवीने सांगितले.