हैदराबाद, आयपीएल २०१९ : आज आयपीएलचा महासंग्राम रंगणार आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यामध्ये आज अंतिम फेरी होणार आहे. हा सामना कोण जिंकेल, याबाबत चर्चांना उधाण आले आहे. पण आयपीएलच्या अंतिम फेरीत आतापर्यंत टॉसनेही निर्णायक भूमिका बजावली आहे.
आतापर्यंत आयपीएच्या अकरा फायनल्स झाल्या आहेत. या ११ फायनल्समध्ये टॉस जिंकणाऱ्या संघाने आठवेळा जेतेपदाला गवसणी घातली आहे. त्यामुळे आयपीएलच्या फायनलमध्ये टॉसचेही महत्व आहे. त्याचबरोबर आतापर्यंत चेन्नई आणि मुंबई यांच्यांमध्ये तीनवेळा अंतिम फेरी रंगली आहे. या तिन्ही अंतिम फेरीत प्रथम फलंदाजी करणारा संघच विजयी ठरला आहे.
मुंबई इंडियन्स आमि चेन्नई सुपर किंग्स हे आयपीएलच्या अंतिम फेरीत चौथ्यांदा समोरासमोर येणार आहेत. या दोन्ही संघांच्या नावावर प्रत्येकी तीन आयपीएल जेतेपद आहेत. यंदाच्या आयपीएलमध्ये मात्र मुंबई इंडियन्सचे नाणे खणखणीत वाजले आहे. त्यांनी चेन्नई सुपर किंग्सला तीनही सामन्यांत पराभवाची चव चाखवली आणि फायनलमध्येही तसेच होईल, अशी चाहत्यांना अपेक्षा आहे. या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने चांगलीच उजळणी केली आहे. त्याने मुंबई इंडियन्सच्या मागील तीन जेतेपदांमधील अविश्वसनीय क्षण सांगितले आणि संघाच्या थ्री पिलर्सचेही आभार मानले.
चेन्नईने 2010 मध्ये मुंबईच्या डी वाय पाटिल स्टेडियमवर मुंबईला 22 धावांनी नमवून जेतेपद पटकावले होते. त्यानंतर 2013 मध्ये मुंबईने कोलकाताच्या इडन गार्डन्सवर चेन्नईचा 23 धावांनी, तर 2015 मध्ये कोलकातावरच चेन्नईचा 41 धावांनी पराभव केला. त्यामुळे आता चेन्नईविरुद्ध मुंबई जेतेपदाची हॅटट्रिक साजरी करतो की चेन्नई जेतेपदाच्या शर्यतीत बरोबरी करतो याची उत्सुकता आहे. चेन्नईने आयपीएलमध्ये सर्वाधिक 8 वेळा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे, तर मुंबई इंडियन्स पाचव्यांदा फायनल खेळणार आहे. या दोन्ही संघांनी यंदाच्या हंगामात एकूण 19103 धावा केल्या आहेत आणि यात 769 षटकार व 1633 चौकारांचा समावेश आहे. त्यासह गोलंदाजीत त्यांनी 666 विकेट्स घेतल्या आहेत.