कोलकाता, आयपीएल 2019 : कोलकाता नाइट रायडर्सच्या 232 धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सचे तगडे फलंदाज फक्त कागदावरील वाघ ठरले. हार्दिक पांड्या वगळता मुंबईचे अन्य फलंदाज तगड्या आव्हानाच्या दडपणाखाली विकेट देऊन माघारी परतले. हार्दिकने 34 चेंडूंत 6 चौकार व 9 षटकार खेचून 91 धावांची वादळी खेळी केली. पण, त्याची ही फटकेबाजी मुंबईला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरली. मुंबई इंडियन्सचा सल्लागार आणि भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकर याने हार्दिकच्या खेळीचे तोंडभरून कौतुक केले, परंतु त्याचवेळी त्याने अन्य फलंदाजांच्या कामगिरीवर तीव्र नाराजी प्रकट केली.
सलामीला बढती मिळालेल्या शुबमन गिलनं ख्रिस लीनच्या सोबतीनं कोलकाताला दमदार सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 96 धावांची भागीदारी केली. लीनने 29 चेंडूंत 8 चौकार व 2 षटकारांसह 54 धावा चोपल्या. त्यानंतर रसेल नावाचे वादळ घोंगावलं. रसेल आणि गिल जोडीनं अर्धशतकी भागीदारी केली. गिल 45 चेंडूंत 6 चौकार व 4 षटकार खेचून 76 धावांत माघारी परतला. उर्वरित षटकांत रसेरची षटकार-चौकारांच्या आतषबाजीनं इडन गार्डन दणाणून सोडलं. रसेलने 40 चेंडूंत नाबाद 80 धावा कुटल्या आणि त्यात 6 चौकार व 8 षटकारांचा समावेश होता. या त्रिकुटाच्या फटकेबाजीच्या जोरावर कोलकाताने 2 बाद 232 धावांचा डोंगर उभा केला. यंदाच्या आयपीएलमधील ही सर्वोत्तम धावसंख्या ठरली.
तत्पूर्वी, तेंडुलकरने शुबमन गिल, ख्रिस लीन आणि आंद्रे रसेल या कोलकाताच्या खेळाडूंचेही कौतुक केले होते. त्याचवेळी त्याने मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांना आव्हानाचा सामना करण्यासाठी तयार राहण्याचे आवाहनही केले होते.
(IPL 2019 : रोहित 'असं' वागणं बरं नाही; KKR विरुद्ध अखिलाडूवृत्तीचं दर्शन, Video)