जयपूर, आयपीएल 2019 : किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धचा सामना राजस्थानचा संघ जिंकता जिंकता हरला. राजस्थानने फक्त एका फलंदाजांच्या मोबदल्यात शतक पूर्ण केले होते. पण त्यानंतर त्यांचे 70 धावांमध्ये त्यांनी तब्बल आठ फलंदाज गमावले. पण या सामन्याचा टर्निंग पॉइंट काय ठरला ते तुम्हाला माहिती आहे का...
किंग्ज इलेव्हन पंजाबच्या 185 धावांचा पाठलाग करताना राजस्थानने चांगली सुरुवात केली होती. राजस्थानने बाराव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर शतक पूर्ण केले होते. पण त्यानंतर राजस्थानचा डोलारा कोसळला. मोठे फटके मारण्याच्या नादात राजस्थानच्या फलंदाजांनी आपल्या विकेट्स पंजाबला आंदण दिल्या आणि पराभव ओढवून घेतला.
कर्णधार अजिंक्य रहाणे आणि जोस बटलर यांनी अर्धशतकी सलामी दिली होती. रहाणे बाद झाल्यावरही बटलरने पंजाबच्या गोलंदाजांच्या समाचार घेतला. बटलर धडाकेबाज फलंदाजी करत होता. पण त्याला पंजाबचा कर्णधार आर. अश्विनने ज्याप्रकारे आऊट केले, तो या सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला.
अश्विनने चेंडू टाकण्यापूर्वीच बटलरने क्रीझ सोडले होते. हे अश्विनच्या लक्षात आले आणि त्याने चेंडू न टाकता बटलरला रनआऊट केले. यावेळी बटलर आणि अश्विन यांच्यामध्ये वाद झाला. पंचांनी तिसऱ्या पंचांकडे हे प्रकरण सुपूर्द केले. तिसऱ्या पंचांनी यावेळी बटलर बाद झाल्याचा निर्णय दिला आणि त्यानंतर सामना पंजाबच्या बाजूने फिरला.
सलामीवीर ख्रिस गेलच्या भन्नाट खेळीच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबला राजस्थानपुढे185 धावांचे आव्हान ठेवता आले. पंजाबची सुरुवात चांगली झाली नाही. त्यांनी आपला सलामीवीर लोकेश राहुल हा चार धावांवर बाद झाला. पण त्यानंतर गेलची वादळी खेळी पाहायला मिळाली. गेलने 47 चेंडूंत आठ चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 79 धावांची भन्नाट खेळी साकारली.
धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल आता विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांच्या पंक्तीत येऊन बसला आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबचा सलामीवीर असलेल्या गेलने आयपीएलमधल्या चार हजार धावा पूर्ण केल्या आहेत.