बंगळुरू, आयपीएल 2019 : रॉयल चॅलेंजर बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यातला सामना लसिथ मलिंगाच्या नो बॉलमुळे गाजला. मलिंगाची ती चुक पकडण्यात पंच सुंदरम रवी यांना अपयश आहे. रवी यांच्या त्या चुकीवर बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीनं तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. पण, कोहलीच्या या नाराजीनंतरही रवी यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता कमीच आहे. कारण बीसीसीआयकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव असलेले भारतीय पंचच उपलब्ध नाहीत.सध्या इंडियन प्रीमिअर लीगच्या 56 सामन्यांसाठी मैदानावरील आणि टिव्ही अशा एकून 11 भारतीय पंचांची नेमणूक करण्यात आली आहेत. रवी यांना चुकीचे नकारात्मक गुण मिळतील, त्यापलिकडे बीसीसीआय कठोर कारवाई करू शकत नाही. ''सध्या आम्ही 17 पंचांची नेमणूक केली आहे. त्यापैकी 11 भारतीय आणि 6 परदेशी पंच आहेत. याशिवाय 6 भारतीय पंच चौथ्या पंचाच्या भूमिकेत काम करत आहेत,'' अशी माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली आहे. रवी हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) एलिट पॅनलवर असलेले एकमेव भारतीय आहेत. त्यांनाच मलिंगाचा तो नो-बॉल पकडण्यात अपयशा आले आणि बंगळुरूला 6 धावांनी सामना गमवावा लागला. या सामन्यानंतर कोहली म्हणाला की,''पंचांनी डोळे उघडे ठेवायला हवेत. हे आयपीएल आहे, क्लब क्रिकेट नाही.'' मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मानेही पंचांच्या या चुकीवर आश्चर्य व्यक्त केले. शर्मा म्हणाला,''मैदान सोडल्यानंतर तो नो बॉल असल्याचे मला माहित पडले. अशा चुका खेळाला मारक आहेत." मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना 187 धावा चोपल्या. प्रत्युत्तरात बंगळुरूनं एबी डिव्हिलियर्सच्या 41 चेंडूंतील 70 धावांच्या जोरावर 5 बाद 181 धावांपर्यंत मजल मारली.
प्ले-ऑफ सामन्यातून पत्ता कटरवी आणि दुसरे पंच नंदन यांना आयपीएलच्या प्ले ऑफ सामन्यातून वगळण्यात येणार असल्याचे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कळत आहे. भारताच्या 11 पंचांपैकी केवळ 5 जणांकडेच आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव आहे. रवी आणि नंदन यांच्याशिवाय शामशुद्दीन, अनील चौधरी आणि नितीन मेनन हे आयसीसीच्या आंतरराष्ट्रीय पॅनलमध्ये आहेत. अन्य सहा पंच स्थानिक सामन्यांत कार्यरत असतात.