हैदराबाद, आयपीएल 2019 : पंचांचा निर्णय अंतिम राहील, हे आपण मानतो. पण काही वेळा पंचांकडूनही चुका घडतात. सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्यात अशीच एक गोष्ट मैदानातील पंच नाही तर तिसऱ्या पंचांकडून घडल्याचे पाहायला मिळाल्याची चर्चा चाहत्यांमध्ये रंगत होती. पण हा प्रसार योग्य आहे की नाही, याबाबत काहींच्या मनात संभ्रम कायम आहे.
हैदराबादविरुद्धच्या सामन्यात मुंबईची सुरुवात चांगली झाली नाही. ही गोष्ट घडली तेराव्या षटकात. मुंबईचा इशान किशन चांगली फलंदाजी करत होता. तेराव्या षटकातील पाचव्या चेंडूवर इशान किशन चोरटी धाव घेण्यासाठी धावला. त्यावेळी त्याला किरॉन पोलार्डने नाकारले. किशन त्यावेळी माघारी फिरला. त्यावेळी हैदराबादच्या क्षेत्ररक्षकाने चेंडू थेट यष्टीरक्षक जॉनी बेअरस्टोवकडे फेकला. चेंडू हातात येऊन स्टम्पला लावण्यापूर्वी जॉनीकडून मोठी चूक झाली होती. बेअरस्टोवने किशनला रनआऊट करण्यापूर्वी स्टम्पला स्पर्श केला आणि बेल्सही पडल्या होत्या. त्यानंतर बेअरस्टोवने स्टम्पला चेंडू लावला. त्यावेळी तिसऱ्या पंचांनी इशानला आऊट दिले.
सनरायझर्स हैदराबादच्या भेदक गोलंदाजीपुढे मुंबई इंडियन्सला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. किरॉन पोलार्डने अखेरच्या षटकांमध्य जोरदार फटकेबाजी केल्यामुळे मुंबईला सन्मानजनक धावसंख्या उभारता आली. पोलार्डने अखेरच्या षटकांमध्ये दमदार फटकेबाजी केली. पोलार्डने 26 चेंडूंत नाबाद 46 धावा केल्या, त्यामुळे मुंबईला 136 धावा करता आल्या.
हैदराबादने नाणेफेक जिंकत मुंबईला फलंदाजीसाठी पाचारण केले. कर्णधाराचा हा निर्णय योग्य असल्याचे हैदराबादच्या गोलंदाजांनी दाखवून दिले. मुंबईला सातत्याने धक्के देत हैदराबादच्या गोलंदाजांनी मुंबईच्या धावसंख्येला वेसण घालण्याचे काम चोख बजावले. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला शून्यावर असताना जीवदान मिळाले होते. पण रोहितलाही यावेळी मोठी खेळी साकारता आली नाही. रोहितला 11 धावांवर समाधान मानावे लागले. रोहित बाद झाल्यानंतर मुंबईच्या एकाही फलंदाजाला जास्त काळ खेळपट्टीवर तग धरून राहता आले नाही.