मोहाली, आयपीएल 2019 : सलग सहा सामन्यांतील पराभवाची मालिका खंडीत करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने शनिवारी आयपीएलच्या 12व्या मोसमात पहिल्या विजयाची चव चाखली. किंग्स इलेव्हन पंजाबने प्रथम फलंदाजी करताना ख्रिस गेलच्या नाबाद 99 धावांच्या जोरावर 173 धावा केल्या होत्या. विराट कोहली ( 67) आणि एबी डिव्हिलियर्स ( 59) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर बंगळुरूने आठ विकेट्स राखत हा सामना जिंकला. त्यामुळे आयपीएलच्या 12व्या मोसमात प्रथमच विजयी संघाचा कर्णधार म्हणून कोहली पत्रकारांना सामोरे गेला. पण, विजयाच्या आनंदात मिठाचा खडा पडण्याची बातमी समोर आली आहे.
किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात षटकांचा वेग संथ राखल्यामुळे कोहलीला कारवाईला सामोरे जावे लागले आहे. आयपीएलच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कोहलीला 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएलच्या 12व्या मोसमात षटकांचा वेग संथ राखल्यामुळे कारवाई होणारा कोहली हा तिसरा कर्णधार ठरला आहे. ''बंगळुरू संघाकडून प्रथमच आयपीएलच्या नियमाचे उल्लंघन झाले आहे. त्यामुळे कोहलीला 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे,''असे आयपीएल आयोजकांनी स्पष्ट केले.
याआधी मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आणि राजस्थान रॉयल्सचा कर्णधार अजिंक्य रहाणे यांना या कारवाईचा सामना करावा लागला होता. पुढील सामन्यांत ही चूक पुन्हा घडल्यास कोहलीवर एका सामन्याची बंदी होऊ शकते. शिवाय कर्णधाराला 24 लाखांचा दंड आणि प्रत्येक खेळाडूच्या मॅच फीमधून 25 % रक्कम दंड म्हणून वसूल केली जाईल. तिसऱ्यांदा चूक घडल्यास कर्णधारावर एका सामन्याची बंदी आणि 30 लाखांचा दंड अशी शिक्षा होईल. सामना संपताच पार्थिव पटेलची हॉस्पिटलकडे धाव, जाणून घ्या कारण?बंगळुरूचा यष्टिरक्षक पार्थिव पटेल हा गेल्या काही महिन्यांपासून तणावात आहे. त्याला आयपीएलमधील आपल्या संघासाठी योगदान देण्याबरोबरच आजारी वडीलांची काळजी घेण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. पार्थिवच्या वडीलांना ब्रेन हॅमरेज झाल्यामुळे फेब्रुवारी महिन्यात अहमदाबाद येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पार्थिवला संघासोबत अनेक शहरांत प्रवास करावा लागत आहे आणि अशा वेळेस त्याचे लक्ष सतत फोनकडे असते. पण, घरातून फोन आल्यावर भीतीच वाटते, असे पार्थिव सांगतो. त्यामुळे मॅच संपल्यावर पार्थिव लगेच वडीलांना पाहण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जातो. संघाने त्याला तशी परवानगी दिली आहे.