मुंबई, आयपीएल 2019 : इंडियन प्रीमिअर लीगचा 12वा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. येत्या रविवारी यंदाचा आयपीएल चषक कोण उंचावेल हे स्पष्ट होईल. इथपर्यंतच्या प्रवासात क्रिकेटप्रेमींना अनेक थरारक लढतींचा आस्वाद लुटता आला. याही हंगामात चाहत्यांचे मनोरंजन केले. भारताचा माजी गोलंदाज अनिल कुंबळेने आयपीएलमधील 'ड्रीम इलेव्हन' जाहीर केला. विशेष म्हणजे त्याच्या या संघात जगातील सर्वोत्तम फलंदाज आणि भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीसह रोहित शर्मा यांना स्थान देण्यात आलेलं नाही. त्यामुळे कुंबळेच्या या निवडीवर सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. CricketNext या स्पोर्ट्स वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत त्यानं हा संघ जाहीर केला.
कुंबळेच्या या संघात सलामीची जबाबदारी सनरायझर्स हैदराबादचा डेव्हिड वॉर्नर आणि किंग्स इलेव्हन पंजाबचा लोकेश राहुल यांच्या खांद्यावर आहे. वॉर्नरने यंदाच्या मोसमात सर्वाधिक धावा करत ऑरेंज कॅप नावावर केली आहे. वॉर्नरने 12 सामन्यांत 143.86 च्या स्ट्राईक रेटने 692 धावा केल्या आहेत, तर राहुलने 14 सामन्यांत 593 धावा चोपल्या आहेत.
मधल्या फळीत दिल्ली कॅपिटल्सचे श्रेयस अय्यर, रिषभ पंत आणि चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांचा समावेश करण्यात आला आहे. अष्टपैलू खेळाडू म्हणून कोलकाता नाईट रायडर्सचा आंद्रे रसेल आणि मुंबई इंडियन्सचा हार्दिक पांड्या या संघात आहेत. गोलंदाजीची जबाबदारी इम्रान ताहीर ( चेन्नई सुपर किंग्स), श्रेयस गोपाळ ( राजस्थान रॉयल्स), कागिसो रबाडा ( दिल्ली कॅपिटल्स) आणि जसप्रीत बुमराह ( मुंबई इंडियन्स) यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
अनिल कुंबळेनं सांगितलं, 'विराट'सेनेचं काय चुकलं!भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळेने RCBच्या अपयशामागचे कारण सांगितले. तो म्हणाला,''RCBची संघनिवड चुकली. त्यांनी अंतिम संघात केवळ तीनच परदेशी खेळाडूंना खेळवलं. त्यांच्या फलंदाजीची बाजू पूर्णपणे एबी डिव्हिलियर्स आणि विराट कोहली यांच्यावरच अवलंबुन होती. या दोघांच्या अपयशानंतर अन्य फलंदाजांना आपली कामगिरी बजावण्यात अपयश आले. गोलंदाजीच्या बाबतीत सांगायचे, तर त्यांच्या वरिष्ठ गोलंदाज उमेश यादवला सातत्य राखता आलेले नाही."