बंगळुरू, आयपीएल 2019 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला इंडियन प्रीमिअर लीगच्या 12व्या मोसमातील अखेरच्या सामन्यात विजय मिळवण्यात यश आले. सनरायझर्स हैदराबादविरुद्धची ही लढत बंगळुरूने 4 विकेट राखून जिंकली. शिमरोन हेटमायर ( 75) आणि गुरकिरत मन सिंग ( 65) यांनी फटकेबाजी करून बंगळुरूला 175 धावांचे लक्ष्य पार करून दिले. या सामन्यात हैदराबादच्या खलील अहमदने बंगळुरूची डोकेदुखी वाढवली होती. त्याने तीन महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या आणि त्यात बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीचाही समावेश होता. कोहलीनं सामना संपल्यानंतर खलीलची शाळा घेतल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
अखेरच्या साखळी सामन्यात कोहलीला 16 चेंडूंत 7 धावा करता आल्या. खलीलने त्याला बाद केले. पण, हेटमायर आणि गुरकिरत यांनी बंगळुरूचा विजय पक्का केला. बंगळुरूने चार गुणांसह आयपीएलमधून निरोप घेतला. हेटमायर आमि गुरकिरत यांनी चौथ्या विकेटसाठी 144 धावांची भागीदारी केली. हैदराबादचे 176 धावांचे लक्ष्य बंगळुरूने 19.2 षटकांत 6 विकेट्सच्या मोबदल्यात पार केले.
विराट बाद झाल्याचा व्हिडीओ.... https://www.iplt20.com/video/186566
सामन्यानंतर कोहलीनं खलीलची चांगलीच शाळा घेतली. विजयामुळे आनंदात असलेला कोहली सामन्यानंतर खलीलसोबत थट्टामस्करी करताना दिसला.
हैदराबादचा कर्णधार केन विल्यम्सनच्या ( 70) दमदार खेळीच्या जोरावर त्यांना बंगळुरुपुढे आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली. आरसीबीकडून वॉशिंग्टन सुंदरने सर्वाधिक तीन विकेट्स पटकावल्या. केनने अखेरच्या षटकांमध्ये जोरदार फटकेबाजी केल्यामुळे हैदराबादला प्रथम फलंदाजी करताना 175 धावा करता आल्या.