हैदराबाद, आयपीएल २०१९ : आयपीएलचा मोसम आता संपत आला आहे. कारण रविवारी आयपीएलची अंतिम फेरी रंगणार आहे. अंतिम फेरीमध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यांमध्ये जेतेपदासाठी तुंबळ युद्ध रंगणार आहे. पण जरा विचार करा, डेव्हिड वॉर्नर, आंद्रे रसेल, हार्दिक पंड्या, इम्रान ताहिर, कागिसो रबाडा, जसप्रीत बुमरा हे नावाजलेला खेळाडू एकाच संघात पाहायला मिळाले तर... पण असा विचार केला आहे तो भारताचे माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी.
आयपीएलच्या लिलावाच्या वेळी प्रत्येक संघाला एक ठराविक रक्कम दिलेली असते. त्या रक्कमेमध्येच खेळाडूंची निवड करायची असते. त्यामुळेच सर्व नामांकित खेळाडू एकाच मालकाला संघात घेता येत नाहीत. त्याचबरोबर काही खेळाडू संघ मालक आपल्या संघात कायम ठेवतात. त्यामुळे काही नावाजलेले खेळाडू आपल्या जुन्याच संघात पाहायला मिळतात.
पण आपल्या मनातील एक संघ बनवताना तुम्हाला पूर्ण मोकळीक असते. कुंबळे यांनी सध्या एक आयपीएलमधील सर्वोत्तम संघ बनवला आहे. या संघाचे कर्णधारपद कुंबळे यांनी महेंद्रसिंग धोनीला दिले आहे. या संघात रिषभ पंतचा समावेश करण्यात आला असला तरी यष्टीरक्षणाची जबाबदारीही धोनीकडेच देण्यात आली आहे.
या संघाचे सलामीवीर असतील ते म्हणजे डेव्हिड वॉर्नर आणि लोकेश राहुल. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करायला श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत यांची निवड करण्यात आली आहे. धोनी हा चांगला फिनिशर असला तरी त्याला फलंदाजीमध्ये पाचवा क्रमांक दिला आहे. त्यानंतर मात्र दोन धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू फलंदाजीला उतरतील आणि ते असतील हार्दिक पंड्या आणि आंद्रे रसेल.
कुंबळे यांनी या संघात दोन वेगवान आणि दोन फिरकी गोलंदाजांचा समावेश केला आहे. आयपीएलमध्ये भेदक गोलंदाजी करत सर्वाधिक विकेट्स मिळवणारा, पण दुखापतीमुळे मायदेशी परतलेल्या कागिसो रबाडाला संघात स्थान देण्यात आले आहे. त्याचबरोबर दुसरा वेगवान गोलंदाज म्हणून जसप्रीत बुमराला संधी देण्यात आली आहे. आतापर्यंत आयपीएलमध्ये आपल्या फिरकीच्या तालावर फलंदाजांना नाचवणाऱ्या इम्रान ताहिर हा संघात आहे. ताहिरला यावेळी श्रेयस गोपाळ साथ देण्यासाठी सज्ज असेल.
कुंबळेंचा सर्वोत्तम आयपीएल संघ : डेव्हिड वॉर्नर, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, महेंद्रसिंग धोनी (कर्णधार आणि यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, आंद्रे रसेल, श्रेयस गोपाळ, इम्रान ताहिर, कागिसो रबाडा आणि जसप्रीत बुमरा.