चेन्नई, आयपीएल 2019 : मनिष पांडेनं डेव्हिड वॉर्नरच्या सोबतीनं शतकी भागीदारी करताना सनरायझर्स हैदराबादला मजबूत धावसंख्या उभारून दिली. वॉर्नरने आयपीएलमधील 43वे अर्धशतक पूर्ण केले, तर पांडेने नाबाद 83 धावा केल्या. हैदराबादने चेन्नई सुपर किंग्ससमोर 176 धावांचे लक्ष्य ठेवले. पांडेने 49 चेंडूंत 7 चौकार व 3 षटकार खेचून 83 धावा करत संघाला 3 बाद 175 धावांपर्यंत मजल मारून दिली. पण, या सामन्यात पुन्हा एकदा चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा स्वतःवर असलेला प्रचंड विश्वास पाहायला मिळाला. वॉर्नरचा यष्टिचीत केल्यानंतर पंचांनी तिसऱ्या पंचाकडे दाद मागण्यापूर्वीच धोनीनं तो बाद असल्याचे संकेत दिले होते.
भज्जीनं पहिल्याच षटकात हैदराबादच्या सलामीवीर जॉनी बेअरस्टोला बाद केले. महेंद्रसिंग धोनीनं यष्टिमागे त्याचा सुरेख झेल टिपला. मनिष पांडेला आज फलंदाजीत बढती मिळाली. तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. पांडेने या संधीचा चांगला उपयोग केला. त्याने डेव्हिड वॉर्नरसह दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. या जोडीनं हैदराबाद संघाला 10 षटकांत 1 बाद 91 धावांपर्यंत मजल मारून दिली. पांडेने 25 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. त्यापाठोपाठ डेव्हिड वॉर्नरनेही अर्धशतक पूर्ण केले. आयपीएलमधील त्याचे हे 43वे अर्धशतक ठरले.
पाहा व्हिडीओ...https://www.iplt20.com/video/178135/can-t-mess-with-msd-s-magic-hands?tagNames=feature,indian-premier-league