बंगळुरू, आयपीएल 2019 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला इंडियन प्रीमिअर लीगमध्ये शुक्रवारी सलग पाचव्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. कोलकाता नाइट रायडर्सने 206 धावांचे लक्ष्य 5 विकेट राखून पार केले. बंगळुरूच्या या हाराकिरीला वैतागलेल्या चाहत्यांनी कोहलीची साथ सोडून चेन्नई सुपर किंग्सच्या महेंद्रसिंग धोनीचा हात पकडल्याचे चित्र शुक्रवारी पाहायला मिळाले. RCBच्या अपयशावर नाराज झालेले चाहते स्टेडियम सोडताना चक्क CSKचे नारे देताना पाहायला मिळाले.
205 धावांचा डोंगर उभारल्यानंतर बंगळुरू सामना जिंकेल असे वाटत होते, परंतु आंद्रे रसेलने सामन्याचे चित्र पालटले. विराट कोहली ( 84), एबी डिव्हिलियर्स ( 63) आणि मार्कस स्टोइनिस ( 28*) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर बंगळुरूने 3 बाद 205 धावा चोपल्या. प्रत्युत्तरात कोलकाताच्या फलंदाजांची संयमी खेळ करतान लक्ष्याचा दिशेने कूच केली. बंगळुरूच्या पवन नेगीने उत्तम गोलंदाजी करताना कोलकाताला धक्के दिले. पण, विराट कोहलीच्या फसलेल्या निर्णयाने आणि क्षेत्ररक्षणातील गचाळपणामुळे बंगळुरूला सामना गमवावा लागला.
रसेलने 13 चेंडूंत 7 षटकार व 1 चौकार खेचून नाबाद 48 धावा चोपून कोलकाताचा विजय निश्चित केला. या पराभवानंतर वैतागलेल्या चाहत्यांनी चेन्नई सुपर किंग्सच्या नावाने नारा देण्यास सुरुवात केली.