मोहाली, आयपीएल 2019 : ख्रिस गेल, सर्वांनाच परिचीत असा क्रिकेटपटू. त्याची देहयष्टीही साऱ्यांना माहिती आहे. त्यामुळे गेल जर एखाद्या व्यक्तीवर धडकला तर त्या व्यक्तीचे काय होऊ शकते, याचा अंदाज तुम्ही घेऊ शकता. गेल मैदानात असतानाच थेट पंचांनाच धडकल्याचे वृत्त समोर येत आहे. हा नेमका प्रकार काय घडला, याची उत्सुकता चाहत्यांना आहे.
किंग्ज इलेव्हन पंजाब आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यामध्ये रविवारी सामना झाला. हा दोन्ही संघांचा अखेरचा साखळी सामना होता. या सामन्यातच ही गोष्ट पाहायला मिळाली.
या सामन्यात चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना 170 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी गेल आणि लोकेश राहुल हे सलामीला आले होते. चेन्नईच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना पाचव्या षटकामध्ये हा प्रकार घडल्याचे पाहायला मिळाले. हे पाचवे षटक चेन्नईचा वेगवान गोलंदाज दीपक चहर टाकत होता.
चहरच्या पाचव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर गेल चोरटी धाव घेण्यासाठी धावला. त्याने एक धाव पूर्ण केली आणि त्यादरम्यान तो मैदानावरील पंचांना धडकला. त्यानंतर गेलने मस्करीमध्ये पुन्हा एकदा पंचांना धडक दिल्याचे पाहायला मिळाले.
हा पाहा व्हिडीओ
पंजाबचा शेवट गोड, चेन्नईचे क्वालिफायर वन मधील स्थान कायम
लोकेश राहुल ( 71) आणि ख्रिस गेल (28) यांच्या 108 धावांच्या सलामीनेच किंग्स इलेव्हन पंजाबचा विजय पक्का केला होता. मात्र, हरभजन सिंगने पंजाबला लागोपाठ तीन धक्के देत सामन्यात चुरस निर्माण केली. निकोलस पुरणचा झेल सोडणे चेन्नई सुपर किंग्सला महागात पडले आणि पंजाबने विजयासह आयपीएलचा निरोप घेतला. चेन्नईचे 171 धावांचे लक्ष्य पंजाबने सहज पार केले. पुरणने 21 चेंडूंत 36 धावा केल्या. या पराभवामुळे चेन्नईला अव्वल स्थानावर कायम राहण्यासाठी मुंबई इंडियन्सच्या निकालावर अवलंबून रहावे लागेल. पण, त्यांनी क्वालिफायर 1 मधील स्थान पक्के केले आहे.
चेन्नई सुपर किंग्सने फॅफ ड्यू प्लेसिस आणि सुरेश रैना यांच्या दमदार खेळीच्या जोरावर किंग्स इलेव्हन पंजाबसमोर 171 धावांचे लक्ष्य ठेवले. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करून विक्रमाला गवसणी घातली. त्यांना अंबाती रायुडू व महेंद्रसिंग धोनी यांचा विक्रम मोडला. ड्यू प्लेसिसचे शतक अवघ्या 4 धावांनी हुकले. सॅम कुरनच्या अप्रतिम यॉर्करने ड्यू प्लेसिसचा त्रिफळा उडवला. ड्यू प्लेसिसने 55 चेंडूंत 10 चौकार व 4 षटकारांसह 96 धावा केल्या. रैना 38 चेंडूंत 5 चौकार व 2 षटकारांसह 53 धावा केल्या. पंजाबच्या कुरनने तीन, तर मोहम्मद शमीने दोन विकेट घेतल्या.