कोलकाता, आयपीएल 2019 : प्रत्येक खेळाडूमध्ये संघ भावना असायला हवी. एका संघातील खेळाडू खांद्याला खांदा लावून भिडतात आणि प्रतिस्पर्ध्याला धूळ चारण्याचा प्रयत्न करतात. पण कोलकाता नाइट रायडर्स संघात मात्र वेगळीच गोष्ट पाहायला मिळाली. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात केकेआरचा कर्णधार दिनेश कार्तिक आणि रॉबिन उथप्पा यांच्यात चक्क भांडण पाहायला मिळाले.
या सामन्यातील 16व्या षटकात ही गोष्ट घडली. हे षटक पीयुष चावला टाकत होता. या षटकाच्या पहिल्या चेंडूवर कृणाल पंड्याने षटकार लगावला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरही पंड्या षटकार मारण्यासाठी सरसावला. पण त्याचा हा फटका चुकला आणि चेंडू हवेत उंच उडाला. हा झेल पकडण्यासाठी रॉबिन उथप्पा सरसावला. पण चेंडू दिनेश कार्तिकच्या जवळ होता. त्यामुळे हे दोघेही झेल घेण्यासाठी एकाच दिनेश धावले. त्यावेळी दोघे एकमेकांवर आपटले आणि झेल सुटला. त्यावेळी या दोघांमध्ये भांडण झाले आणि उथप्पा कार्तिकवर नाराज होऊन आपल्या जागी परतल्याचे पाहायला मिळाले.
हा पाहा व्हिडीओ
केकेआरच्या २३३ धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सचा हार्दिक पंड्याने एकट्याने किल्ला लढवला. पण हार्दिकला अन्य फलंदाजांची साथ न मिळाल्याने मुंबईला विजय मिळवता आला नाही. त्यामुळे हार्दिकची ही झुंजार खेळी व्यर्थ ठरली. हार्दिकने ३४ चेंडूंत ९१ धावांची तुफानी खेळी साकारली.मुंबईने नाणेफेक जिंकून कोलकाताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. या गोष्टीचा चांगलाच फायदा केकेआरने उचलला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच त्यांनी मुंबईच्या गोलंदाजीवर हल्ला करायला सुरुवात केली. ख्रिस लिन आणि शुभमन गिल या दोघांनीही अर्धशतके लगावत संघाला चांगली सुरुवात करून दिली. लिन आणि गिल या दोघांनी संघासाठी ९६ धावांची सलामी दिली. लिनने २९ चेंडूंत ५४ धावांची खेळी साकारली. लिन बाद झाल्यावर गिलने गोलंदाजांचा समाचार घेणे सुरुच ठेवले. गिलने ४५ चेंडूंत सहा चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर ७६ धावा काढल्या. त्यानंतर आंद्रे रसेल आणि दिनेश कार्तिक यांनीही मुंबईच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला.