मुंबई, आयपीएल 2019 : कोलकाता नाईट रायडर्स संघाने शुक्रवारी आयपीएलमध्ये प्ले ऑफच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे. कोलकाताने किंग्स इलेव्हन पंजाबचा 7 विकेट्स व दोन षटके राखून पराभव केला. या विजयासह कोलकाताने गुणतालिकेत पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे. त्यामुळे प्ले ऑफच्या एका स्थानासाठीच्या शर्यतीत कोलकाताने स्वतःला कायम राखले आहे. पंजाबचे प्ले ऑफचे आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे.
कोलकाताच्या खात्यात तेरा सामन्यानंतर 12 गुण झाले आहेत, तर पंजाब 10 गुणांसह 7 व्या स्थानावर कायम आहेत. आता आठही संघांचे प्रत्येकी एक सामने शिल्लक आहेत. त्यापैकी चेन्नई सुपर किंग्स 18 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. मुंबई इंडियन्स 16 गुणांसह दुसऱ्या, तर दिल्ली कॅपिटल्स 16 गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. दिल्लीपेक्षा ( -0.096) मुंबईचा ( 0.321) नेट रनरेट चांगला आहे. सध्याच्या परिस्थितीत सनरायझर्स हैदराबाद चौथ्या स्थानासाठी कोलकाताच्या आघाडीवर आहे. दोन्ही संघांच्या खात्यात 12 गुण आहेत, परंतु हैदराबादचा नेट रन रेट उत्तम आहे.
राजस्थान रॉयल्स 11 गुणांसह पंजाब व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूपेक्षा पुढे आहे. चेन्नई, मुंबई आणि दिल्ली या संघांनी प्ले ऑफ मध्ये प्रवेश पक्का केला आहे. त्यामुळे एका स्थानासाठी कोलकाता, हैदराबाद व राजस्थान यांच्यात चढाओढ आहे. चेन्नई, मुंबई आणि दिल्ली यांच्यात अव्वल दोन स्थानासह साखळी फेरीचा निरोप घेण्याची चुरस आहे. कारण अव्वल दोन संघांना क्वालिफायर १ मध्ये प्रवेश मिळेल. म्हणजे एक अतिरिक्त संधी मिळेल. त्यामुळे शनिवारी आणि रविवारी होणाऱ्या सामन्यानंतर सर्व चित्र स्पष्ट होईल.
असे आहेत सामने
- शनिवार
- दिल्ली कॅपिटल्स वि. राजस्थान रॉयल्स
- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. सनरायझर्स हैदराबाद
- रविवार
- किंग्स इलेव्हन पंजाब वि. चेन्नई सुपर किंग्स
- मुंबई इंडियन्स वि. कोलकाता नाईट रायडर्स