मोहाली, आयपीएल 2019 : दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सकडून निखिल नाईक हा सलामीला आला आणि साऱ्यांनीच डोळे विस्फारले. कारण यापूर्वी हे नाव फारसं कुणाला माहिती नव्हतं. त्यामुळे तो थेट सलामीलाच आल्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
दिल्लीविरुद्धच्या सामन्यात निखील सलामीला येईल, हे कुणाच्या गावीही नव्हते. त्यामुळे त्याला पाहिले आणि साऱ्यांनाच त्याच्याबद्दल प्रश्न पडला. त्यानंतर त्याच्या नावाचा सर्च सुरु झाला.
निखील हा मुळचा सावंतवाडीचा. सावंतवाडीमध्ये त्याने क्रिकेट खेळायला सुरुवात केली. स्थानिक सामन्यांमध्ये निखिलने दमदार कामगिरी केली. त्यामुळे त्याची वर्णी थेट महाराष्ट्राच्या संघात लागली. सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-20 स्पर्धेत निखिलने नेत्रदीपक कामगिरी केली होती. निखिल फलंदाजीबरोबर यष्टीरक्षणामध्येही निष्णात आहे.
आतापर्यंत निखिलने 38 स्थानिक ट्वेन्टी-20 सामने खेळले आहेत. या 38 सामन्यांमध्ये निखिलने 34 वेळा फलंदाजी केली आहे. निखिलने आतापर्यंत नाबाद 95 धावांची धडाकेबाज खेळी साकारली आहे. निखिलची सरासरी 30.32 असून त्याचा स्ट्राइक रेट 130.16 एवढा आहे. यष्टीरक्षण करतानाही निखिलने चांगली कामगिरी केली आहे. त्याच्या नावावर 19 झेल आणि 4 स्टम्पिंग्स आहेत.
कोलकाकडून खेळताना दिल्लीविरुद्धच्या सामन्यात निखिलला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. निखिल या सामन्यात ख्रिस लिनबरोबर सलामीला उतरला होता. पण निखिलला या सामन्यात सात धावा करता आल्या. यामध्ये एका चौकाराचा समावेश होता. निखिल या सामन्यात पायचीत झाला. या निर्णयाविरोधात निखिलने डीआरएस घेण्याचा निर्णय घेतला होता. पण यामध्ये तो अपयशी ठरला.
कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये शनिवारचा दुसरा सामना रंगणार आहे. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला धसका आहे तो कोलकात्याच्या आंद्रे रसेलचा. कारण आतापर्यंतच्या दोन्ही सामन्यांत रसेलने नेत्रदीपक कामगिरी केली आहे. आतापर्यंत कोलकात्याने दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवला असून ते गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. दिल्लीचा संघ दोन सामने खेळला असून त्यांना एका सामन्यात विजय तर एका सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे.