हैदराबाद, आयपीएल 2019 : इंडियन प्रीमिअर लीगच्या 12व्या सत्रातील जेतेपदाचा मान रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सने पटकावला. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सला यंदा मुंबईविरुद्ध एकही विजय मिळवता आला नाही आणि अंतिम फेरीतही त्यांनी अपयशाचाच पाढा गिरवला. या सामन्यानंतर मुंबई इंडियन्सच्या जेतेपदाबरोबरच धोनीच्या निवृत्तीच्या चर्चेला सुरुवात झाली. सामना संपल्यानंतर धोनीला पुढील आयपीएलमध्ये खेळणार का हा प्रश्न विचारला गेला. धोनीनं तितक्याच शितीफीनं त्याचं उत्तर दिलं.
मुंबई इंडियन्सने किरॉन पोलार्डच्या ( 25 चेंडूंत नाबाद 41 धावा ) धडाकेबाज खेळीच्या जोरावर 8 बाद 149 धावा उभ्या केल्या. प्रत्युत्तरात चेन्नईला 7 बाद 148 धावांपर्यंतच मजल मारता आली. शेन वॉटसनने ( 80 धावा) एकाकी झुंज दिली. पण, अखेरच्या षटकात लसिथ मलिंगाने चेन्नईच्या तोंडचा घास पळवला आणि मुंबईचे चौथ्यांदा आयपीएलचा चषक उंचावला. यंदाची आयपीएल ही धोनीची अखेरची असल्याचा तर्क लावला जात आहे. त्यामुळेच सामन्यानंतर त्याला पुढील आयपीएलमध्ये खेळणार का, असे विचारण्यात आले.
धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही फार सामने सध्या खेळत नाही. कसोटीतून निवृत्ती स्वीकारणारा धोनी वन डे व ट्वेंटी-20 क्रिकेट खेळत आहे. इंग्लंडमध्ये होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर धोनी निवृत्ती घेईल असेही बोलले जात आहे. त्यामुळे आयपीएलच्या बाबतीत धोनीच्या मनात काय सुरू आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.
सामन्यानंतर तो म्हणाला,''एक संघ म्हणून आमची कामगिरी समाधानकारक झाली, परंतु काही गोष्टींचा विचार करण्याची गरज आहे. मधल्या फळीनं निराश केलं, परंतु तरीही आम्ही संघाची घोडदौड कशीबशी कायम राखली. आजच्या सामन्यात चांगली कामगिरी करायला हवी होती. ही मजेशीर स्पर्धा आहे. आम्ही चषकाचे आदानप्रदान करत आहोत. दोन्ही संघांकडून चूका झाल्या, परंतु विजयी संघाने एक चूक कमी केली. आमच्या गोलंदाजांनी त्यांची भूमिका चोख बजावली. फलंदाजांकडून अपेक्षित कामगिरी झाली नाही.''
पुढील आयपीएलच्या प्रश्नावर धोनी म्हणाला,''पुढील वर्षी सातत्यपूर्ण कामगिरी करण्याच्या दृष्टीने विचार करण्याची गरज आहे. पुढील वर्षी खेळणार की नाही यावर आता सांगणे ही घाई ठरेल. वर्ल्ड कप स्पर्धा हे प्राधान्य आहे. त्यानंतर आम्ही CSKविषयी बोलू. गोलंदाजांची कामगिरी उत्तम झाली आहे, परंतु फलंदाजांविषयी चर्चा करण्याची गरज आहे. पुढील वर्षी तुम्हाला भेटण्याची आशा करतो.''
पाहा व्हिडीओ...