नवी दिल्ली, आयपीएल 2019 : राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्यात एक मजेशीर किस्सा पाहायला मिळाला. येस-नो, येस-नो करत एक फलंदाज चक्क रनआऊट झाल्याचे पाहायला मिळाले.
हा किस्सा घडला तो राजस्थानचा संघ बॅटींग करत असताना. राजस्थानचे संजू सॅमसन आणि महिपाल लोमोर हे दोघे खेळपट्टीवर होते. संजू बॅटींग करत होता आणि अक्षर पटेल त्याला चेंडू टाकत होता. त्यावेळी संजूने अक्षरच्या पाचव्या षटकातील दुसरा चेंडू ऑफ साईडला ढकलला. त्यावेळी धाव घ्यायची की नाही, याबाबत या दोघांमध्ये एकवाक्यता नव्हती. सुरुवातीला संजूने धाव घेण्याची नसल्याचे सांगितले. पण त्यानंतर त्याने हा निर्णय बदलला आणि धाव घेण्यासाठी तो धावत सुटला. त्यावेळी महिपालने ही धाव नाकारली. संजू माघारी परतला होता, पण क्रीझमध्ये जाण्यापूर्वीच तो रनआऊट झाला.
पाहा हा व्हिडीओ
राजस्थान रॉयल्सने गाशा गुंडाळला, दिल्लीचा विजयगोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीनंतर फलंदाजांनी आपली भूमिका चोख बजावताना दिल्ली कॅपिटल्सलाविजय मिळवून दिला. इशांत शर्मा व अमित मिश्रा यांनी राजस्थान रॉयल्सचे कंबरडे मोडले आणि त्यांना निर्धारित 20 षटकांत 9 बाद 115 धावांवर समाधान मानण्यास भाग पाडले. राजस्थानचा रियान पराग ( 50) एकटा लढला. माफक लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीचीही तारांबळ उडाली. इश सोढीनं त्यांना धक्क्यांवर धक्के दिले. पण, रिषभ पंतने चिवट खेळ करताना दिल्लीचा विजय पक्का केला. पंतने 38 चेंडूंत 2 चौकार व 5 षटकार खेचून नाबाद 53 धावा केल्या.
इशांत शर्मा ( 3/38) आणि अमित मिश्रा ( 3/17) यांनी दिलेल्या धक्क्यातून राजस्थान रॉयल्सला सावरता आले नाही. प्ले ऑफ शर्यतीत आव्हान कायम राखण्यासाठीच्या सामन्यात राजस्थानच्या फलंदाजांना अपयश आले. रियान पराग वगळता राजस्थानच्या एकाही फलंदाजाला दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांसमोर टिकता आले नाही. राजस्थानने 116 धावांचे माफक लक्ष्य दिल्लीसमोर ठेवले. परागने अर्धशतकी खेळी केली. परागने 47 चेंडूंत 50 धावा करून आयपीएलमध्ये अर्धशतक झळकावणाऱ्या सर्वात युवा फलंदाजाचा मान पटकावला. परागने 17 वर्ष 178 दिवस असताना अर्धशतक झळकावले. त्याने संजू सॅमसनचा 18 वर्ष 169 दिवसांचा विक्रम मोडला. पराग 49 चेंडूंत 4 चौकार व 2 षटकार खेचून 50 धावा केल्या. ट्रेंट बोल्टने ( 2/27) दोन विकेट घेतल्या.
प्रत्युत्तरात दिल्लीला 28 धावांवर पहिला धक्का बसला. इश सोढीनं दिल्लीचा सलामीवीर शिखर धवनला (16) परागकरवी झेलबाद केले. पुढच्याच चेंडूवर सोढीनं पृथ्वी शॉला ( 8) त्रिफळाचीत केले. पण, त्यानंतर श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत यांनी तिसऱ्या विकेटसाठी 33 धावांची भागीदारी केली. श्रेयस गोपाळने ही जोडी तोडली. त्याने अय्यरला ( 15) बाद केले. त्यानंतर पंत आणि कॉलीन इंग्रामने दिल्लीचा विजय निश्चित केला. या दोघांची 22 धावांची भागीदारी सोढीनं संपुष्टात आणली. त्याने इंग्रामला बाद केले. त्यानंतर आलेला रुथरफोर्डही (11) बाद झाला, परंतु तोपर्यंत दिल्ली विजयासमीप आला होता.