हैदराबाद, आयपीएल २०१९ : यंदाच्या आयपीएलचा अंतिम सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यामध्यो होणार आहे. एक कर्णधार म्हणून महेंद्रसिंग धोनीला रोहित शर्मापेक्षा जास्त अनुभव आहे. पण यंदाच्या अंतिम फेरीसाठी मात्र चेन्नईपेक्षा मुंबईचेच पारडे जड असल्याचे म्हटले जात आहे. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार तर चेन्नईपेक्षा मुंबईच भारी असल्याचे दिसत आहे.
यंदाच्या हंगामामध्ये मुंबई आणि चेन्नई यांच्यांमध्ये तीन सामने खेळवण्यात आले. या तिन्ही सामन्यांमध्ये मुंबईलाच विजय मिळवता आला आहे. या तीन सामन्यांमध्ये चेन्नईला एकदाही मुंबईला पराभूत करता आलेले नाही.
यंदाच्या हंगामातील या दोघांमध्ये पहिला सामना वानखेडे मैदानावर झाला. या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना १७० धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला १३३ धावाच करता आल्या. या दोन्ही संघांतील दुसरा सामना चेन्नईमध्ये झाला. या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना १५५ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईचा संघ १०९ धावांमध्येच गारद झाला.
या दोन सामन्यांनंतर मुंबई आणि चेन्नई हे पहिल्या क्वालिफायर सामन्यात आमने-सामने आले होते. या सामन्यात चेन्नईची प्रथम फलंदाजी होती. चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना १३१ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा सहजपणे पाठलाग करत मुंबईने अंतिम फेरीत प्रवेश केला होता. त्यामुळे आतापर्यंत या हंगामात झालेल्या तिन्ही सामन्यांमध्ये मुंबईचेच वर्चस्व पाहायला मिळाले आहे. त्यामुळे यंदाच्या अंतिम सामन्यात चेन्नईपेक्षा मुंबईचेच पारडे जड असल्याचे म्हटले जात आहे.
एलिमिनेटरच्या सामन्यात पहिल्या षटकापासून दिल्ली कॅपिटल्सवर नशीब रुसलेलं पाहायला मिळालं. आयपीएलच्या इतिहासात प्रथमच अंतिम फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी उत्सुक असलेल्या दिल्लीनं सामन्याच्या पहिल्याच षटकात चेन्नई सुपर किंग्सच्या सलामीवीरांना बाद करण्याची सोपी संधी गमावली आणि त्यांचा आत्मविश्वासही हरवला. फॅफ ड्यू प्लेसिस आणि शेन वॉटसन यांनी वैयक्तिक अर्धशतकं झळकावून चेन्नईला विजयाच्या उंबरठ्यावर आणून बसवले. अन्य फलंदाजांनी त्यावर कळस चढवत चेन्नईला अंतिम फेरीत प्रवेश मिळवून दिला. चेन्नईचा हा आयपीएलमधील 100 वा विजय ठरला. मुंबई इंडियन्सनंतर विजयाचे शतक पूर्ण करणारा हा दुसरा संघ ठरला. चेन्नईने 164 सामन्यांत 100 विजय मिळवले. चेन्नई आणि मुंबई यांच्यात आता जेतेपदाची लढत होणार आहे आणि आयपीएलचे जेतेपद चौथ्यांदा कोण पटकावतो याची उत्सुकता लागली आहे.