इंडियन प्रीमिअर लीगचे ( आयपीएल ) 13वे हंगाम सुरू होण्यासाठी 20 दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे, तरीही भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून ( बीसीसीआय) वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही. 19 सप्टेबंर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत संयुक्त अरब अमिराती येथे ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. आयपीएलसाठी सर्व संघ दुबईत दाखल झाले आहेत आणि सात दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करून सरावालाही सुरुवात केली आहे. पण, मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांना सराव सुरू करता आला नव्हता. मुंबई इंडियन्स आणि KKRच्या खेळाडूंना 14 दिवसांसाठी क्वारंटाईन व्हावं लागणार होते, परंतु आयपीएल गव्हर्निंग काऊंसिलच्या मध्यस्थीनंतर क्वारंटाईन नियम बदलण्यात आले आहेत.
IPL 2020 Schedule Update : दोन लेगमध्ये होणार आयपीएलचे सामने; जाणून घ्या कसं असेल वेळापत्रक!
मुंबई इंडियन्स, कोलकाता नाइट रायडर्ससाठी का होता वेगळा नियम?दुबई आणि अबु धाबी येथे कोरोना व्हायरस संदर्भात वेगवेगळे नियम आहेत. त्यामुळे दोन शहरांमध्ये प्रवास करण्यासाठी नियमांचे पालन करावे लागत आहे. अबु धाबीत प्रवेश करण्यापूर्वी रॅपिड टेस्ट करून घेणं अनिवार्य आहे, रिपोर्ट निगेटिव्ह आला तरच सीमा ओलांडण्याची परवानगी दिली जाते. अशा कठोर प्रक्रिया सामन्याच्या दिवशी अमलात आणणे अवघडच आहे. त्यामुळे बीसीसीआयनं अजूनही वेळापत्रक जाहीर केलेलं नाही. सध्या मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स हे संघ वगळता अन्य सहा संघ दुबईतच आहेत. मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स अबु धाबी येथे आहेत.
अबु धाबी येथे कोरोना व्हायरससाठीचे नियम कठोर आहेत आणि त्यामुळे मुंबई व कोलकाता संघांना 14 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करावा लागणार आहे. त्यामुळे या दोघ संघापेक्षा अन्य संघांना सरावासाठी अधिकचे 7 दिवस मिळत आहेत. मुंबई इंडियन्सनं बीसीसीआयकडे मध्यस्थीची मागणी केली आहे.
आयपीएल गव्हर्निंग काऊंसिलची मध्यस्थीएमिरेट्स क्रिकेट बोर्डाला विनंती केल्यानंतर मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांना आजपासून सराव करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मुंबई इंडियन्सच्या सूत्रांनीही आजपासून संघ सराव करण्यास मैदानावर उतरेल, असे सांगितले आहे.