नवी दिल्लीः इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) पुढील मोसमात राजस्थान रॉयल्सचा अजिंक्य रहाणेदिल्ली कॅपिटल्सकडून खेळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रहाणेला आपल्या ताफ्यात दाखल करून घेण्यासाठी दिल्ली संघाकडून जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यांनी रहाणेला आपल्या संघात घेण्यासाठी राजस्थान संघाशी बोलणी सुरू केली आहे. त्यामुळे 2020च्या आयपीलमध्ये रहाणे दिल्लीकडून खेळताना दिसल्यास आश्चर्य वाटायला नको.
सूत्रांनी सांगितले की,''रहाणेला संघात घेण्यासाठी दिल्ली कॅपिटल्सचे प्रयत्न सुरू आहेत, परंतु हे डील होईल का, हे आताच सांगणे अवघड आहे. या करार होण्यापूर्वी अनेक नियमांचे काटेकोर पालन होणे गरजेचे आहे. रहाणे हा राजस्थान संघाचा मोठा खेळाडू आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यापूर्वी ते विचार नक्की करतील. होय पण दोन्ही संघांमध्ये चर्चा सुरू आहेत.''
ही डील यशस्वी झाल्यास आयपीएलमधील हा मोठा फेरबदल ठरेल. गतवर्षी दिल्लीनं शिखर धवनला सनरायझर्स हैदराबादकडून आपल्या चमूत दाखल करून घेतले होते. धवनने दिल्लीकडून खेळताना 2019च्या मोसमात 521 धावा केल्या होत्या आणि दिल्लीनं 2012नंतर प्रथमच आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये प्रवेशही केला होता.
रहाणेच्या येण्यानं दिल्ली संघाला काय फायदा होईल?दिल्लीचा संघ हा युवा आणि अनुभवी खेळाडूंची योग्य सांगड घातलेला संघ आहे. धवन आणि इशांत शर्मा यांच्याकडे अनुभव आहे आणि रहाणेच्या येण्यानं कठीण प्रसंगी संघाला आधार मिळणार आहे. त्यामुळे ही डील यशस्वी झाल्यास, स्वप्न पूर्ण होईल,''असे दिल्ली कॅपिटल्सच्या अधिकाऱ्यानं सांगितले. रहाणेने 2008 आणि 2009 मध्ये मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर 2011मध्ये तो राजस्थान रॉयल्सचा सदस्य झाला. राजस्थानवरील बंदीच्या काळात रहाणेने पुणे संघाचे प्रतिनिधित्व केले.