मुंबई : यंदाच्या आयपीएलमधील प्ले ऑफच्या आशा कायम ठेवण्यासाठी सनरायझर्स हैदराबादला प्रत्येक सामना जिंकणे अनिवार्य आहे. त्यादृष्टीने पहिले आणि भक्कम पाऊल टाकताना हैदराबादने मंगळवारी फॉर्ममध्ये असलेल्या दिल्ली कॅपिटल्सला तब्बल ८८ धावांनी नमवले. या दमदार विजयानंतर हैदराबादने गुणतालिकेत १० गुणांसह सहावे स्थान मिळवताना आपली सरासरीही उंचावली आणि प्ले ऑफच्या आशा कायम ठेवल्या. मात्र या धमाकेदार विजयानंतर कर्णधार डेव्हिड वॉर्नरची हालत अजून वाईट झाली. याला कारणही तसेच आहे.
दुबई येथे झालेल्या सामन्यात वॉर्नरने आपल्या वाढदिवसाच्या दिवशीच तुफानी अर्धशतक झळकावताना ३४ चेंडूंत ६६ धावांचा तडाखा दिला. त्याला रिद्धिमान साहानेही ४५ चेंडूंत ८७ धावा कुटताना चांगली साथ दिली. या दोघांच्या जोरावर हैदराबादने २० षटकांत २ बाद २१९ धावांचा एव्हरेस्ट उभारला. यानंतर दिल्लीची दाणादाण उडवली ती राशिद खानने. त्याने भेदक फिरकी गोलंदाजी करताना ४ षटकांत केवळ ७ धावा देत ३ खंदे फलंदाज बाद केले. यामुळे दिल्लीचा डाव केवळ १३१ धावांत संपुष्टात आला.या शानदार विजयाचा जल्लोषही हटके झाला. एकतर संघाचा दणदणीत विजय, त्यात कर्णधाराचा वाढदिवस यामुळे आनंद द्विगुणित झालेल्या हैदराबादच्या खेळाडूंनी हॉटेलमध्ये पोहचताच तुफानी सेलिब्रेशन केले. मात्र यामध्ये वाट लागली वॉर्नरची.
हॉटेलच्या लॉबीमध्येच वॉनरच्या बर्थ डेचा केक कापण्यात आला. यानंतर हैदराबादच्या खेळाडूंनी पुढे येत आपल्या कर्णधाराच्या तोंडावर संपूर्ण केके फासला. त्याला प्रतिकार करण्याचीही संधी न देता सर्व सहकारी केक फासून पळून गेले. मात्र वॉरनरने तरीही धाव घेत बदला घेण्याचा प्रयत्न केला. यामध्ये वॉर्नरच्या हाती लागला श्रीलंकेचा दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन. वॉर्नरने मुरलीधरनच्या चेहऱ्यावर केक फासून जीव शांत केला. हैदराबादने ट्वीटरवर सेलिब्रेशनचा हा व्हिडिओ अपलोड केला असून यावर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे.