मुंबई: कोरोनाच्या संकटामुळे यंदाची Indian Premier League (IPL 2020) यूएईमध्ये खेळविण्याचा निर्णय झाला. अबुधाबी, शारजाह आणि दुबई या तीन ठिकाणी सर्व सामने खेळविण्यात येत आहेत. संपूर्ण स्पर्धेसाठी बायो सिक्योर वातावरण तयार करण्यात आले असून सट्टेबाज-बुकींना दूर ठेवण्यासाठी कडक ‘फिल्डिंग’ही लावण्यात आली. मात्र तरीही सट्टेबाजांनी खेळाडूंपर्यंत मजल मारली असल्याचे स्पष्ट झाल्याने आता खळबळ उडाली आहे. आयपीएलमध्ये सहभागी असलेल्या एका क्रिकेटपटूने ही माहिती दिल्याचे बीसीसीआयच्या भ्रष्टचार विरोधी विभागाचे (एसीयू) प्रमुख अजित सिंग यांनी सांगितले.
बायो सिक्योर वातावरण तयार करण्यात आले असतानाही यंदाच्या आयपीएलवर फिक्सिंगचे ढग निर्माण झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार एका बाहेरील एजंटने आयपीएलच्या खेळाडूशी मॅच फिक्सिंगबाबत संपर्क केला. त्याचवेळी, हा खेळाडू कोण, हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. या खेळाडूने स्ट्टेबाजांनी केलेल्या संपर्काची माहिती तत्काळ एसीयूला दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
एसीयू प्रमुख अजित सिंग यांनी या बाबत माहिती देताना सांगितले की, ‘आयपीएलच्या एका खेळाडूशी अज्ञात व्यक्तीने फिक्सिंगबाबत संपर्क करण्याचा प्रयत्न केला. आम्ही सध्या त्या एजंटचा शोध घेत आहोत. यामध्ये थोडा अधिक वेळ लागेल. भ्रष्टाचार विरोधी नियमानुसार माहिती देणाºया खेळाडूबाबत सध्या कोणालाही काहीही सांगण्यात येणार नाही.’ऑनलाईनच झाला असणार संपर्क!
आयपीएलमधील सर्व खेळाडू बायो बबल सुरक्षेत आहेत. यानुसार संघाबाहेरील कोणत्याही व्यक्तीला खेळाडूची भेट घेता येत नाही. त्यामुळेच त्या अज्ञात व्यक्तीने क्रिकेटपटूशी ऑनलाईन माध्यमाने संपर्क केल्याचे एसीयूचे म्हणणे आहे. फिक्सिंगबाबत संपर्क झाल्यानंतर लगेच त्या खेळाडूनी याबाबतची माहिती एसीयूला दिली.