Indian Premier League ( IPL 2020) मध्ये तीन सामन्यांत दोन अर्धशतकी खेळी करणाऱ्या सनरायझर्स हैदराबादच्या ( Sunrisers Hyderabad) सलामीवीर जॉनी बेअरस्टोला ( Jonny Bairstow) एक वाईट बातमी मिळाली आहे. मंगळवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या ( Delhi Capitals) सामन्यात त्यानं 53 धावांची उपयुक्त खेळी केली आणि दोन झेलही टिपले. SRHनं दोन पराभवानंतर मंगळवारी IPL 2020मधील पहिला विजय नावावर केला. याआधी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB) विरुद्ध त्यानं 61 धावा कुटल्या होत्या.
SRHच्या या सलामीवीराला बुधवारी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळानं ( ECB) दणका दिला. ECB नं बुधवारी 2020-21च्या सेंट्रल काँट्रॅक्टची घोषणा केली. त्यातून कसोटी खेळाडूंमधून बेअरस्टोला वगळण्यात आले. 31 वर्षीय बेअरस्टोचा मागील वर्षी कसोटी करारात समावेश करण्यात आला होता, परंतु त्याला एकच सामना खेळता आला आणि त्यानंतर त्याला कसोटी संघातून वगळण्यात आले. या करारानुसार त्याला वर्षाला 6.5 कोटी रुपये मिळत होते, परंतु त्याला वगळण्यात आल्यानं आर्थिक नुकसानही सहन करावं लागणार आहे. सनराझर्स हैदराबादनं त्याला 2.2 कोटींत करारबद्ध केले आहे.
ECBचे 2020-21चे करारबद्ध खेळाडू
- कसोटी व मर्यादित षटकांतील खेळाडू - जोफ्रा आर्चर, जोस बटलर, जो रूट, बेन स्टोक्स, ख्रिस वोक्स
- कसोटी संघातील खेळाडू - जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड, रोरी बर्न्स, झॅक क्रॅवली, सॅम कुरन, ऑली पोप, डॉम सिब्ली
- मर्यादित षटकांतील खेळाडू - मोईन अली, जॉनी बेअरस्टो, टॉम कुरन, इयॉन मॉर्गन, आदिल रशीद, जेसन रॉय, मार्क वूड
- कोणाला मिळाली बढती? - डॉम बेस, ख्रिस जॉर्डन, जॅक लीच, डेवीड मलन
- जलदगती गोलंदाज - सकीब महमूद, क्रेग ओव्हर्टन, ऑली स्टोन.