- अयाझ मेमन, कन्सल्टिंग एडिटर
डेथ ओव्हर्समध्ये झालेली आणि तुफानी फटकेबाजी आयपीएलच्या दुसऱ्या आठवड्यातील महत्त्वाच्या चर्चेतील एक महत्त्वाचा मुद्दा आहे. रोहित, राहुल आणि सॅमसन या आघाडीच्या टॉप आॅर्डर्ससह पोलार्ड आणि हार्दिक या फिनिशर्सनी मैदानावर पाडलेला षटकारांचा पाऊस लक्षवेधी ठरला. राहुल तेवतियानेही एकाच षटकात ५ षटकार ठोकत राजस्थानला पंजाबविरुद्ध गमावलेला सामना जिंकून दिला. २२३ धावांच्या हिमालयाएवढे लक्ष्य त्याने सहजपणे अवाक्यात आणले. त्याच वेळी, वॉटसन, वॉर्नर, रसेल, बेयरस्टॉ, मॉर्गन आणि पंत यांच्यामध्येही उत्तुंग षटकार ठोकण्याची क्षमता असून अद्याप ते म्हणावे तसे फॉर्ममध्ये आलेले नाहीत.भारतीय खेळाडूंसाठी हा आठवडा मिश्र यशाचा ठरला. रोहितने जबरदस्त फॉर्म दाखवला असून पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला असूनही त्याने मुंबईला गुणतालिकेत अव्वल स्थानी नेले. आरसीबीने मुंबईविरुद्ध सुपर ओव्हरमध्ये थरारक विजय मिळवला. या सामन्यात विराट कोहलीने विजयी चौकार मारत संघाला विजयी केले. मात्र याआधी तीन डावांमध्ये तो सपशेल अपयशी ठरला.