दुबई : ‘सनरायजर्स हैदराबादकडून ८८ धावांनी झालेला पराभव मोठा असला तरी पराभवाचे दु:ख मानण्याची ही वेळ नाहीच. आणखी दोन सामने शिल्लक असून आम्हाला एका विजयाचीच गरज आहे. तरीही पुढील दोन्ही सामने जिंकून प्ले ऑफमध्ये प्रवेश करणार,’ असा विश्वास दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार श्रेयस अय्यर याने व्यक्त केला. आमच्या संघाने पॉवर प्लेमध्येच सामना गमावला होता, अशी कबुली देत अय्यर म्हणाला, ‘मागच्या तीन सामन्यांपासून आम्ही धडाकेबाज विजयाच्या प्रतीक्षेत आहोत. या पराभवानंतर तरी मोठ्या विजयाची प्रेरणा मिळेल, असा मला विश्वास आहे. पॉवर प्लेमध्ये केवळ ७० धावा होताच सामना गमावून बसलो. आता कणखर आणि सकारात्मक मानसिकतेने उतरावे लागणार आहे. याआधीच्या तिन्ही सामन्यातील गचाळ कामगिरी डोळ्यापुढे ठेवूनच पुढील वाटचाल करावी लागणार आहे.’दोन्ही सामने जिंकून प्ले ऑफ गाठू
‘पुढील दोन्ही सामन्यात मोठ्या धावा उभारून विजयासह प्ले ऑफमध्ये धडक देण्याचा निर्धार आहे. आजही त्याच इराद्याने खेळलो. जॉनी बेयरेस्टो ऐवजी केन विलियम्सनची चौथ्या स्थानावर गरज होती. वृद्धिमान साहाने कमालीची फलंदाजी केली. त्याच्या तसेच विजय शंकरच्या जखमेची मी माहिती घेत आहे. राशिद हा बळी घेण्यात आणि धावा रोखण्यात तरबेज आहे. आम्हाला शारजात आणखी दोन सामने खेळायचे असल्याने २२० धावा काढल्यास प्ले ऑफ गाठू शकतो, अशी खात्री आहे.’’-डेव्हिड वॉर्नर, कर्णधार सनरायजर्स हैदराबाद