मुंबई : दिग्गज क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) याने निवृत्ती घेण्याच्याआधीपासूनच त्याचा वारसदार कोण, यावर क्रिकेटविश्वात चर्चा सुरु रंगली होती. नक्कीच यामध्ये धोनीच्या जागी रिषभ पंतला (Rishabh Pant) मोठी पसंती मिळत आहे. मात्र, त्याचवेळी लोकेश राहुल (Lokesh Rahul), संजू सॅमसन(Sanju Samson), रिद्धिमान साहा (Riddhiman Saha)
यांच्याकडूनही पंतला कडवी टक्कर मिळत आहे. त्याचवेळी वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज ब्रायन लारा (Brian Lara)याने मात्र वेगळेच मत मांडले असून, ‘लोकेश राहुलने आता यष्टीरक्षण करु नये,’ असे वक्तव्य लाराने केले आहे.
एका क्रीडा वाहिनीच्या क्रिकेट कनेक्टेड कार्यक्रमामध्ये लाराने भारतीय क्रिकेटविषयी आपले मत मांडले. सध्या आयपीएलमध्ये राहुल शानदार कामगिरी करत असून तो किंग्ज इलेव्हन पंजाबसाठी कर्णधार, यष्टीरक्षक आणि सलामीवीर फलंदाज अशी तीन भूमिका बजावत आहे. लाराने म्हटले की, ‘माझ्या मते जेव्हा कधी भारतीय क्रिकेटचा विषय येतो, तेव्हा राहुलने यष्टीरक्षणाचा विचार केला नाही पाहिजे. तो शानदार फलंदाज असून त्याने आपले पूर्ण लक्ष फलंदाजीवरच लावावे. त्याने धावांचा डोंगर रचण्याचा प्रयत्न करावा.’लाराने संजू सॅमसनविषयी सांगितले की, ‘सध्या राजस्थान रॉयल्ससाठी संजू सॅमसन भलेही यष्टीरक्षण करत नाही. परंतु, मला माहितेय, हे त्याचे मुख्य काम आहे. संजू शानदार खेळाडू असून तो शारजाहमध्ये कमालीचा खेळला आहे. माझ्या मते गोलंदाजांना पोषक असलेल्या खेळपट्टीवर त्याचे तंत्र थोडे खराब आहे.’लाराने यावेळी पंतबाबतही आपले मत व्यक्त केले. लारा म्हणाला की, ‘पंतबाबत काही वर्षांपूर्वी मी मत व्यक्त केले नसते, मात्र आता तो फलंदाज म्हणून खूप पुढे आला आहे. शिवाय तो आपली जबाबदारी ओळखत आहे. ज्याप्रमाणे तो दिल्ली कॅपिटल्ससाठी खेळला आहे, ते पाहता तो जबाबदारी उचलू पाहतो. जास्तीत जास्त धावा काढण्याचा त्याचा प्रयत्न दिसून येत आहे आणि मोठी धावसंख्या उभारण्याच्या दृष्टीने तो खेळत आहे. त्याने हेच सातत्य कायम राखले, तर तो नक्कीच अव्वल खेळाडू बनेल.’