ललित झांबरे
चेन्नई सुपर किंग्जने (CSK).शुक्रवारी मुंबईविरुध्दचा (MI) सामना 10 विकेटने गमावला. त्यांच्या या सर्वात दारुण पराभवात एकवेळ त्यांची अवस्था 7 बाद, 43 होती आणि अर्धशतकही होईल की नाही याची शंका होती. यात त्यांचे पहिले सहापैकी पाच फलंदाज तर दोन आकडी धावासुध्दा करू शकले नाहीत. आयपीएलमध्ये (IPL) सीएसकेची फलंदाजी फळी तिसऱ्यांदा अशी ढेपाळली आणि योगायोगाने हे तिन्ही सामने मुंबई इंडियन्सविरुद्धचेच होते.
पहिल्यांदा सीएसकेचे आघाडीच्या सहा पैकी पाच फलंदाज एकेरी धावात बाद झाले ते 2013 मध्ये. मुंबई येथील त्या सामन्यात सलामीवीर माईक हसीने 22 धावा केल्या पण समोरचे पाच फलंदाज मुरली विजय 2, सुरेश रैना 0, बद्रीनाथ 0, ब्राव्हो 9 आणि अश्विन 2 हे एकेरी धावात बाद झाले होते आणि चेन्नईचा संघ 79 धावात गारद होऊन त्यांना पराभव पत्करावा लागला होता.
यानंतर गेल्यावर्षी चेन्नईत ते पुन्हा एकदा असेच ढेपाळले. यावेळी पुन्हा एकदा सलामीवीर फलंदाजाने योगदान दिले. मुरली विजयने 38 धावा केल्या पण समोरच्या बाजूने शेन वॉटसन 8, सुरेश रैना 2, अंबाती रायुडू 0, केदार जाधव 6 आणि ध्रुव शोरी 5 हे स्वस्तात परतले. यावेळी चेन्नईचा डाव 109 धावांत आटोपला. हे दोन्ही सामने सामने सीएसकेने पाठलागात गमावले तर तिसऱ्यांदा त्यांची अशीच फलंदाजी ढेपाळलेला सामना त्यांनी शुक्रवारी शारजा येथे गमावला. यावेळी ऋतुराज गायकवाड- 0, फाफ डू प्लेसीस -1, अंबाती रायुडू -2, जगदीशन - 0 आणि रविंद्र जडेजा- 7 हे एकेरी धावात बाद झाले. तरीही सॅम करनच्या अर्धशतकामूळे ते 114 धावांपर्यंत मजल मारु शकले पण शेवटी हासुध्दा सामना त्यांनी गमावलाच.