इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL) पुढील मोसमाची मोर्चेबांधणीला जोरदार सुरुवात झाली आहे. नुकतेच दिल्ली कॅपिटल्सनं राजस्थान रॉयल्सच्या माजी कर्णधार अजिंक्य रहाणेला आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. शिवाय मुंबई इंडियन्सनेही ट्रेंट बोल्टला आपलेसे केले आहे. आयपीएल 2020च्या मोसमासाठी खेळाडूंचा लिलाव 19 डिसेंबरला कोलकाता येथे होणार आहे. तत्पूर्वी ट्रेड ( अदलाबदली) करून संघ त्यांना हवा तो खेळाडू आपल्या ताफ्यात दाखल करून घेत आहेत. आतापर्यंत दिल्लीनं सर्वाधिक खेळाडूंची अदलाबदल केली आहे. यात चेन्नई सुपर किंग्सचे नाव कुठेच दिसत नाही. पण, गुरुवारी चेन्नई सुपर किंग्सने त्याबाबतचे मोठे संकेत दिले. त्यांनी संघातून पाच खेळाडूंना डच्चू देण्याचे धक्कादायक संकेत दिले आहेत. आता हे पाच खेळाडू कोण असू शकतील हे जाणून घेऊया...
काल मुंबई इंडियन्सने न्यूझीलंडचा जलदगती गोलंदाज ट्रेंट बोल्टला आपल्या संघात सहभागी करून घेतले आहे. दिल्ली कॅपिटल्सकडून त्यांनी बोल्टला संघात घेतले. दुसरीकडे राजस्थान रॉयल्सनं अंकित रजपूतला आपल्या संघात घेतले. आर अश्विनीही किंग्ज इलेव्हन पंजाबची साथ सोडून आता दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार आहे. राजस्थान रॉयल्सचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणेनं संघाची साथ सोडली आहे. तो पुढील मोसमात दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार आहे आणि यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
आतापर्यंत यांची झाली अदलाबदली
- मयांक मार्कंडे (1.4 कोटी) मुंबई इंडियन्सच्या या खेळाडूला दिल्ली कॅपिटल्सने आपल्या ताफ्यात घेतले
- दिल्ली कॅपिटल्सचा शेर्फान रुथरफोर्ड ( 6.2 कोटी) मुंबई इंडियन्सकडून खेळणार
- किंग्ज इलेव्हन पंजाबचा आर अश्विन ( 7.6 कोटी) पुढील मोसमात दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार
- दिल्ली कॅपिटल्सचा जगदीशा सुचिथ ( 20 लाख ) किंग्ज इलेव्हन पंजाबच्या ताफ्यात
- दिल्ल कॅपिटल्सचा ट्रेंट बोल्ट ( 2.2 कोटी) मुंबई इंडियन्सच्या संघात
- राजस्थान रॉयल्सचा कृष्णप्पा गौवथम ( 6.2 कोटी) किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळणार
- किंग्ज इलेव्हन पंजाबचा अंकित रजपूत ( 3 कोटी) राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यात
गुरुवारी चेन्नई सुपर किंग्सने एक ट्विट केलं. त्यात त्यांनी पाच खेळाडूंना रिलिज करणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यानुसार अष्टपैलू खेळाडू केदार जाधवला यंदा संघाबाहेर करू शकतात. 7.80 कोटी रक्कम मोजलेल्या केदारला संघासाठी समाधानकारक कामगिरी करता आलेली नाही. केदारसह अंबाती रायुडू, करन शर्मा, सॅम बिलींग आणि मुरली विजय यांना डच्चू दिल जाऊ शकतो, असा तर्क लावला जात आहे.