मुंबई : आज कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (Royal Challengers Bnglore) यांच्यात अटीतटीची लढाई होईल. प्ले ऑफच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी दोन्ही संघांना विजय अनिवार्य असल्याने या सामन्यात तुल्यबळ लढत होतील. सध्या गुणतालिकेत आरसीबी १२ गुणांसह तिसऱ्या स्थानी असून केकेआर १० गुणांसह चौथ्या स्थानी आहे.
सलामीवीर अॅरोन फिंचचा अपवाद सोडला, तर आरसीबीचे सगळेच प्रमुख खेळाडू फॉर्ममध्ये आहेत. दुसरीकडे, केकेआरचा संघ अडखळत जिंकत आहे. मात्र असे असले, तरी आता आरसीबीविरुद्ध त्यांचा स्टार आणि हुकमी गोलंदाज पुनरागमन करत असून यामुळे आरसीबीलाही काहीसे दडपण आले आहे.
केकेआरचा हा हुकमी गोलंदाज आहे सुनील नरेन (Sunil Narain).कल्पक फिरकीच्या जोरावर त्याने अनेक फलंदाजांना आपल्या तालावर नाचवले आहे. शिवाय फलंदाजीमध्येही त्याने आपल्य फटकेबाजीने अनेक गोलंदाजांना घाम फोडला आहे. यंदाच्या सत्रात नरेनला बॅटने फार काही करता आले नाही, मात्र त्याने मोक्याच्यावेळी बळी घेत केकेआरच्या विजयात मोलाचे योगदान दिले आहे.
यंदाच्या सत्रात नरेनच्या गोलंदाजी शैलीबाबत शंका निर्माण झाल्याने त्याला काही सामने संघाबाहेर बसविण्यात आले होते. मात्र आता त्याची गोलंदाजी शैली वैध असल्याचे स्पष्ट करण्यात आल्यानंतर मैदानावर आपली छाप पाडण्यास नरेन उत्सुक आहे. दुसरीकडे, दुखापतीमुळे मागच्या सामन्यात खेळू न शकलेला युवा अष्टपैलू शिवम दुबे हाही आरसीबी संघाकडून पुनरागमन करण्यास सज्ज झाला आहे. त्यामुळेच आजच्या सामन्यात दोन्ही संघ आपल्या पूर्ण ताकदीने उतरणार असून यावेळी चाहत्यांना आक्रमक खेळाची मेजवानीच मिळेल, हे नक्की.