आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( आयसीसी) ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्थगित झाल्याची घोषणा केली अन् त्यानंतर इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) 13व्या मोसमाचा मार्ग मोकळा झाला. आयपीएलचे गव्हर्निंग काऊन्सिलचे चेयरमन ब्रिजेश पटेल यांनी आयपीएल संयुक्त अरब अमिराती ( यूएई) येथे होणार असल्याचे जाहीर केले. यंदाची आयपीएल ही भारताबाहेर होणार असल्याचे निश्चित झाल्यानंतर आता पुढील आठवडयात वेळापत्रकही जाहीर केले जाईल, असे पटेल यांनी सांगितले. आता आयपीएलची तारीख आणि वेळही समोर आली आहे.
यूएईमध्ये आयपीएल 2020 आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती स्पोर्ट्स स्टारला दिलेल्या मुलाखतीत पटेल यांनी दिली. पुढील आठवड्यात आयपीएलच्या गव्हर्निंग काऊन्सिलची बैठक होईल आणि त्यामध्ये स्पर्धेच्या तारखा आणि संचालनाची प्रक्रिया निश्चित केली जाईल, अशी माहिती पटेल यांनी दिली. भारत सरकारनं परवानगी दिल्यानंतर आयपीएल 2020चं वेळापत्रक तयार करण्यात येईल, असं पटेल यांनी पुढे सांगितलं.
28 सप्टेंबर ते 8 नोव्हेंबर या कालावधीत आयपीएलचं आयोजन करण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा आहे. मात्र याबद्दलचं वृत्त पटेल यांनी फेटाळून लावलं. आता नवीन तारीख समोर येत आहे. ब्रॉडकास्टर्सची 26 सप्टेंबर ते 8 नोव्हेंबर या कालावधीत आयपीएल खेळवण्यावर नाराजी आहे. आयपीएल दिवाळीपर्यंत म्हणजेच 14 नोव्हेंबरपर्यंत व्हावी, अशी त्यांची इच्छा आहे. टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार आयपीएल 26 सप्टेंबरपासून नव्हे, तर 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. ब्रॉडकास्टर्सची नाराजी दूर करण्यासाठी बीसीसीआयनं सामन्यांची वेळ 8 ऐवजी 7.30 करण्याचे ठरवले आहे.