चेन्नई सुपर किंग्सचे ( Chennai Super Kings) इंडियन प्रीमिअर लीगमधील ( IPL 2020) आव्हान संपुष्टात आले. मुंबई इंडियन्सविरुद्ध शुक्रवारी त्यांना मानहानिकारक पराभव पत्करावा लागला. मुंबई इंडियन्सनं १० विकेट्स राखून विजय मिळवताना CSKच्या प्ले ऑफच्या स्वप्नांचा चुराडा केला. या पराभवानंतर CSKवर आयपीएल इतिहासात प्रथमच प्ले ऑफमध्ये प्रवेश न करण्याची नामुष्की ओढावली, शिवाय गुणतालिकेत प्रथमच ते तळावर राहिले. या पराभवानं संघातील प्रत्येक जण दुखी झाल्याची कबुली कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं दिली. त्यात मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी संघाच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त करताना गुणतालिकेत CSKसाठी तळाचे स्थानच योग्य असल्याचे मत व्यक्त केले.
करो वा मरो सामन्यात चेन्नई सुपर किंग्सनं ऋतुराज गायकवाड आणि नटराजन जगदीसन यांना संधी दिली. पण, त्यांना या संधीचं सोनं करता आलं नाही. ऋतुराज ( ०), अंबाती रायूडू ( २) व नटराजन ( ०) सलग दोन चेंडूवर माघारी परतले. फॅफ ड्यू प्लेसिसला ( १) बाद करून CSKला मोठ्या अडचणीत आणले. जसप्रीत बुमराह ( २/२५), राहुल चहर ( २/२२) यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. नॅथन कोल्टर नायलनं एक विकेट घेतली. ट्रेंट बोल्टनं सर्वाधिक ( ४/१८) विकेट्स घेतल्या. सॅम कुरननं ४७ चेंडूंत ५२ धावा केल्या आणि त्या जोरावर चेन्नईला ९ बाद ११४ धावा करता आल्या.
प्रत्युत्तरात इशान किशन आणि क्विंटन डी'कॉक यांनी दमदार खेळ करताना मुंबई इंडियन्सला विजय मिळवून दिला. या दोघांनी चेन्नईच्या गोलंदाजांना कोणतीच संधी दिली नाही. इशान किशन ३७ चेंडूंत ६ चौकार व ५ षटकारांसह ६८ धावांवर नाबाद राहीला. क्विंटन डी'कॉकनं ३७ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह नाबाद ४६ धावा केल्या. मुंबई इंडियन्सनं दहा विकेट्स राखून विजय मिळवताना चेन्नई सुपर किंग्सचे Play Offमध्ये प्रवेश करण्याच्या स्वप्नांना सुरुंग लावला.
या सामन्यानंतर फ्लेमिंग म्हणाले,हा पराभव प्रचंड वेदनादायी, निराशाजनक आणि संतापजनक आहे. या संपूर्ण पर्वात संघात अनेक प्रयोग करून पाहिले, परंतु त्याचा फार उपयोग झाला नाही. पर्वाच्या सुरुवातीपासून खेळाडूंनी घेतलेली माघार, त्यानंतर संघाची घडी बसवण्याचे प्रयोग फसले. CSKसाठी गुणतालिकेत तळाचे स्थानच योग्य आहे.''
पाहा व्हिडीओ..
Web Title: IPL 2020: CSK Coach Stephen Fleming Says ‘Chennai Super Kings Deserves Bottom Place in the Points Table’
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.