मुंबई : Indian Premier League (IPL 2020) च्या 13व्या पर्वात माजी विजेत्या चेन्नई सुपरकिंग्जचा (Chennai Superkings) प्रवास अत्यंत निराशाजनक झालेला आहे. सध्या गुणतालिकेत सीएसके संघ सहाव्या स्थानी असून त्यांनी 9 सामन्यांतून केवळ 3 सामने जिंकले आहेत. खेळाडूंची निराशाजनक कामगिरी आणि दुखापती यामुळे संघ यंदाच्या सत्रात हेलकावे खातान दिसत आहे. त्यातच आता सीएसकेचा स्टार अष्टपैलू गंभीररीत्या दुखापतग्रस्त झाला असून यामुळे तो काही दिवसांसाठी किंवा आठवड्यांसाठी संघाबाहेर राहू शकतो, अशी माहिती सीएसकेचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी दिली आहे. त्यामुळे सीएसके संघासमोरील अडचणी आणखी वाढल्या आहेत.
शनिवारी झालेल्या दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सीएसकेचा 5 गड्यांनी पराभव झाला. अखेरच्या दोन षटकांत सीएसकेने काहीप्रमाणात पुनरागमन करत विजयाच्या आशा निर्माण केल्या होत्या. मात्र दुखापतीमुळे स्टार अष्टपैलू ड्वेन ब्रावो याला मैदान सोडावे लागले आणि त्यानंतर तो पुन्हा खेळायलाच आला नाही. यामुळे अखेरचे षटक अनुभवी फिरकीपटू रवींद्र जडेजा याने टाकले आणि येथेच सीएसकेचा घात झाला.
ब्रवोच्या दुखापतीबाबत आता प्रशिक्षक फ्लेमिंग यांनी माहिती दिली आहे. फ्लेमिंग म्हणाले की, ‘ग्रोइन इंज्युरीमुळे ब्रावो पुढील काही दिवस किंवा काही आठवड्यांपर्यंत संघासाठी उपलब्ध नसेल. ब्रावोची दुखापत अत्यंत गंभीर असून यामुळेच तो पुन्हा गोलंदाजीसाठी मैदानात येऊ शकला नाही. या सामन्यात अखेरचे षटक न टाकता आल्याने स्वत: ब्रावो अत्यंत निराश झाला होता. यावरुनच त्याचे संघाप्रती असलेले समर्पण दिसून येते. आता त्याच्या दुखापतीवर आम्हाला सतत नजर ठेवावी लागेल.’
फ्लेमिंग पुढे म्हणाले की, ‘ब्रावो शानदार गोलंदाज आहे. यंदाचे सत्र आमच्यासाठी अडचणींनी भरलेले आहे. अखेरचे षटक जडेजा टाकणार, हे आधीपासून ठरलेले नव्हते. पण, ब्रावो दुखापतग्रस्त झाल्यानंतर आमच्याकडे दुसरा पर्यायही नव्हता.’
Web Title: IPL 2020 CSK vs DC Stephen Fleming reveals how long Dwayne Bravo will be out with injury
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.