शारजाह : अब्राहम डिव्हिलियर्सने ३३ चेंडूत ७३ धावा करीत रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला केकेआरवर ८२ धावांनी विजय मिळवून दिला. कठीण खेळपट्टीवर त्याने सुपर ह्युमन फलंदाजी केल्याचे सांगून कर्णधार विराट कोहली याने विजयाचे श्रेय दणादण फलंदाजीला दिले आहे.
सामनावीर एबीने पाच चौकार आणि सहा षटकार ठोकले. विजयानंतर कोहली म्हणाला, ‘बलाढ्य संघाविरुद्ध शानदार विजय होता. हा आठवडा व्यस्त असून सुरुवात चांगली झाली. मॉरिसच्या समावेशाने गोलंदाजी भेदक बनली आहे. या धावसंख्येमुळे आनंदी होतो. खेळपट्टी शुष्क होती. दव पडले नाहीत. अशावेळी एबी वगळता अन्य फलंदाजांना खेळताना त्रास झाला.’‘पॉवर हिटिंग’मुळे फरक पडला : कार्तिकयेथील मंद खेळपट्टीवर केकेआरला कुलदीप यादवची उणीव जाणवली. त्यातही डिव्हिलियर्सच्या ‘पॉवर हिटिंग’ फटकेबाजीमुळे अंतर निर्माण झाल्याचे मत कर्णधार दिनेश कार्तिक याने व्यक्त केले. कार्तिक म्हणाला, ‘डिव्हिलियर्स शानदार फलंदाज असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. पाच षटकात ८० धावा फटकावून त्याने हातातून सामना हिसकावून घेतला.काल १९४ कसे आणि केव्हा झाले ते आपण पाहिलेच. सर्व काही खरेच अविश्वसनीय होते. मी जेव्हा खेळायला आलो तेव्हा थोडे चेंडू खेळून फटकेबाजी करावी, असा विचार होता. पण डिव्हिलियर्सने अप्रतिम खेळ करायला सुरूवात केला. तिसऱ्या चेंडूपासूनच त्याने फटकेबाजीला सुरूवात केली आणि जे त्याने केले ते फक्त तोच करू शकला असता.