मुंबई: यंदाच्या Indian Premier League (IPL 2020) मध्ये स्पर्धेतून बाहेर होणारा चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Super Kings) पहिला संघ ठरला. चेन्नईची कामगिरी यंदाच्या सत्रात अत्यंत खराब झाली. त्यांनी आतापर्यंत १२ सामन्यांतून केवळ ४ सामने जिंकताना ८ सामने गमावले आहेत. गुणतालिकेत ८ गुणांसह चेन्नई तळाच्या स्थानी असून त्यांच्या प्ले ऑफ गाठण्याच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. मात्र तरीही चाहते सीएसकेच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहेत. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच सीएसकेचे आव्हान साखळी फेरीत संपुष्टात आले. मात्र चाहते अजूनही सीएसकेच्या पाठिशी असल्याची प्रचिती आली असून स्वत: कर्णधार महेंद्रसिंग धोनीने (MS Dhoni) याबाबत भावनिक पोस्ट केली आहे.
आयपीएलमध्ये सर्वाधिक फॅन फॉलोअर्स असलेल्या संघांमध्ये चेन्नईचे स्थान आघाडीवर आहे. त्यातही प्रत्येक सीएसके फॅनसाठी धोनी त्यांच्या घरच्या सदस्याप्रमाणेच आहे. काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर सीएसकेच्या गोपी कृष्णन या अवलिया फॅनच्या घराचे फोटो व्हायरल झाले होते. गोपीने आपले संपूर्ण घर सीएसकेच्या रंगात रंगवले आहे. त्याचप्रमाणे त्याने घराच्या भिंतीवर धोनीचे चित्रही रेखाटले आहे.
अल्पावधीतचे गोपी आणि त्याचे घर सोशल मीडीयावर चर्चेचा विषय बनले. याबाबत प्रतिक्रिया देताना धोनीही भावूक झाला. २६ ऑक्टोबर ला सीएसकेने आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलवर एक व्हिडिओ पोस्ट केला असून यामध्ये धोनीने सीएसकेच्या या जबरा फॅनसाठी मेसेज दिला आहे.
धोनीने म्हटले की, ‘गोपीचे घर मी इन्स्टाग्रामवर पाहिले आणि माझ्यामते हे शानदार गिफ्ट आहे. जर तुम्ही नीट पाहिले तर लक्षात येईल की, हे केवळ माझ्याविषयी नसून संपूर्ण सीएसके संघासाठी आहे. हे लोक सीएसकेचे खूप मोठे चाहते आहेत. हे सहजपणे करता येण्यासारखे काम नाही. यासाठी पूर्ण परिवार सहमत होणे गरजेचे आहे. यानंतरच तुम्ही पुढे वाटचाल करता. ही कामगिरी अशीच आहे.