चेन्नईच्या (CSK) संघाने 10 व्या सामन्यातील सातवा पराभव पत्करल्यावर महेंद्रसिंग धोनीने (Mahendrasingh Dhoni) युवा खेळाडूंबद्दल जे विधान केलंय त्यावरुन टीकेची झोड उठली आहे. क्रिकेटप्रेमींसोबत काही माजी क्रिकेटपटूंनीसुध्दा धोनीच्या विधानावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यात माजी कर्णधार कृष्णम्माचारी श्रीकांतसुध्दा (K. Srikkanth) आहेत. युवा क्रिकेटपटूंचे प्रेरणास्थान असलेल्या आणि त्यांना संधी व प्रोत्साहन देण्याचा लौकिक मिळवलेल्या 'माही' (Maahi) कडून असे विधान आल्याने हा तोच धोनी का, असा प्रश्न आता पडला आहे.
राजस्थानविरुध्दचा (Rajsthan Royals).सामना गमावल्याने चेन्नईचा संघ आता गूणतालीकेत तळाला असून पुढचे चारही सामने मोठ्या फरकाने जिंकले तरच त्यांना काही आशा आहे. आपल्या संघाला यंदा काही भवितव्य नाही हे धोनीनेसुध्दा जवळपास मान्य केले आहे आणि म्हणूनच तो म्हणतो की यंदा आम्ही तसे स्पर्धेत नव्हतोच पण वारंवार संघात बदल करुन उपयोग नसतो. पहिल्या चार-पाच सामन्यात सारेच अनिश्चित असते. आणि खेळाडूंमध्ये असुरक्षिततेची भावना येऊ नये म्हणून फारसे बदल केले नाहीत. या प्रक्रियेत यशापयश हे 'बायडक्ट' असते.
इथवर ठीक होते पण तीन वेळच्या या आयपीएल विजेत्या कर्णधाराने पुढे जे विधान केले ते फारच धक्कादायक होते. धोनी म्हणाला की, सिनीयर खेळाडूंची जागा घेऊ शकतील असे खेळाडू आमच्याकडे नाहीत परंतु त्यांना आता पुढच्या सामन्यांमध्ये कादाचित संधी मिळू शकते आणि त्यात ते दडपणाशिवाय खेळू शकतील. धोनीकडून युवा खेळाडूंबाबत आलेल्या या विधानाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. त्यात माजी कर्णधार व तामिळनाडूचे तडाखेबंद फलंदाज कृष्णम्माचारी श्रीकांतसुध्दा आहेत. त्यांनी या विधानाबद्दल धोनीचा चांगलाच समाचार घेतला आहे.
श्रीकांत म्हणतात, "हे हास्यास्पद आहे. धोनी जे काही म्हणतोय त्याच्याशी सहमत होणे अशक्य आहे. राजस्थान राॕयल्सविरुध्दही सर्वच सिनियर खेळाडू खेळवूनही सीएसकेची कामगिरी निराशाजनक राहिली. फाफ डू प्लेसीस, शेन वाॕटसन, रायुडू, सॕम करन आणि स्वतः धोनीसुध्दा चांगली कामगिरी करू शकला नाही. धोनी जो तर्क मांडतोय तोच स्विकारण्याजोगा नाही. तो प्रक्रियेची गोष्ट करतोय पण मुळात तुमची संघनिवडीची प्रक्रियाच चुकीची आहे. केदार जाधव, पियुष चावला व रवींद्र जडेजा हे अपवादानेच चांगली कामगिरी करू शकले आहेत."
युवा खेळाडूंच्या मुद्द्यावर येताना श्रीकांत म्हणाले, "जगदीशनचे उदाहरण घ्या. त्याला एकच संधी दिली. त्यात त्याने 24 चेंडूत 33 धावा करताना फिरकी गोलंदाजांना समर्थपणे खेळून काढले. मग जगदीशनमध्ये चमक नाही तर केदार जाधवकडे आहे का? पियुष चावला चमकतोय का? हे विधानच हास्यास्पद आहे,आणि धोनी म्हणतो ती प्रक्रिया पाळत पाळत चेन्नईचे आव्हानच संपले आहे. आता युवा खेळाडूंना संधी देण्याची भाषा होतेय पण जगदीशन आधीच चमकलाय.
राजस्थानविरुध्द धोनीने ज्याप्रकारे पियुष चावलाचा वापर केला त्यावर श्रीकांत यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. कर्ण शर्माला वगळण्याचा निर्णयच मुळात चुकीचा होता. तो महागडा ठरत असला तरी विकेट काढतोय. आणि सामना हातातुन गेलेला होता तेंव्हा पियुषकडे चेंडू सोपवण्यात आला. धोनी हा ग्रेट क्रिकेटर आहे पण चेंडूवर पकड येत नव्हती हा त्याचा दावा मी मान्य करु शकत नाही असे श्रीकांत यांनी म्हटले आहे.