मुंबई : Indian Premier League (IPL 2020)च्या पहिल्या क्वालिफायर लढतीत आज गतविजेत्या मुंबई इंडियन्सपुढे (Mumbai Indians) दिल्ली कॅपिटल्सचे (Delhi Capitals) कडवे आव्हान असेल. या सामन्यात मुंबईचे पारडे वरचढ असले, तरी अखेरच्या साखळी सामन्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्ध झालेला १० गड्यांनी पराभव हा मुंबईकरांसाठी चिंतेचा विषय आहे.
त्यातच काही प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत मुंबईला आव्हानही निर्माण करता आले नव्हते. प्ले ऑफमध्ये सर्व प्रमुख खेळाडू खेळणार असल्याचे जवळपास निश्चित असून कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) स्टार हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) खेळण्याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
हार्दिकला एक-दोन सामन्यांचा अपवाद वगळता फारशी छाप पाडता आली नाही. त्याला फलंदाजीची संधीही फारशी मिळाली नाही. त्यातच अखेरच्या साखळी सामन्यात त्याला संघाबाहेर बसवल्याने तो पुन्हा दुखापतग्रस्त झाल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र आता रोहितने या सर्व चर्चांना पूर्णविराम देताना हार्दिक प्ले ऑफमध्ये खेळणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
त्यामुळेच आता क्रिकेटचाहत्यांमध्ये उत्साह संचारला आहे. रोहितने हैदराबादविरुद्धच्या सामन्यानंतर सांगितले की, ‘हार्दिक पांड्या पूर्णपणे फिट असून तो प्ले ऑफमध्ये खेळताना दिसेल. त्याला केवळ विश्रांती देण्यात आली होती. तो दुखापतग्रस्त नाही. इतर खेळाडूंना संधी देण्यासाठी हार्दिकला विश्रांती देण्यात आली होती.’
रोहित म्हणाला, ‘फिटनेसच्या दृष्टीने तो पूर्णपणे बरा आहे. केवळ त्याला विश्रांती देण्याचा आमचा प्रयत्न होता. यामुळे अन्य खेळाडूंना संधी देता आली असती. त्यामुळे प्ले ऑफच्या लढतीत तो पूर्णपणे सज्ज राहील, अशी अपेक्षा आहे.’ त्याचप्रमाणे, वर्कलोड कमी करण्यासाठी जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट यांना विश्रांती देण्यात आली होती. त्यामुळे दोघेही प्ले ऑफमध्ये खेळताना दिसतील, असेही रोहित म्हणाला.
Web Title: ipl 2020 Don't get confused hardik pandya will be ready for playoffs says rohit sharma
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.