IPL 2020 Final MI vs DC: ट्रेंट बोल्टनं दिले झटके, तरीही दिल्ली कॅपिटल्सच्या सन्मानजनक धावा

IPL 2020 Final MI vs DC:  इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) १३व्या पर्वाचा अंतिम सामन्यात अनुभवी मुंबई इंडियन्सने ( Mumbai Indians) पहिल्या सत्रात वर्चस्व गाजवले

By स्वदेश घाणेकर | Published: November 10, 2020 09:16 PM2020-11-10T21:16:31+5:302020-11-10T21:28:01+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2020 Final MI vs DC: DC finish with 156/7 from their 20 overs, Shreyas Iyer and Rishabh Pant score half century | IPL 2020 Final MI vs DC: ट्रेंट बोल्टनं दिले झटके, तरीही दिल्ली कॅपिटल्सच्या सन्मानजनक धावा

IPL 2020 Final MI vs DC: ट्रेंट बोल्टनं दिले झटके, तरीही दिल्ली कॅपिटल्सच्या सन्मानजनक धावा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) १३व्या पर्वाचा अंतिम सामन्यात अनुभवी मुंबई इंडियन्सने ( Mumbai Indians) पहिल्या सत्रात वर्चस्व गाजवले असले तरी दिल्ली कॅपिटल्सच्या ( Delhi Capitals) कर्णधार श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) आणि रिषभ पंत ( Rishabh Pant) यांच्या दमदार खेळीनं सर्वांना मंत्रमुग्ध केलं. ३ बाद २२ अशा अडचणीत सापडलेल्या DCला श्रेयस व रिषभ या जोडीनं सावरलं आणि त्याच जोरावर त्यांनी MIसमोर आव्हानात्मक लक्ष्य उभं केलं. ट्रेंट बोल्टनं ( Trent Boult) आज पुन्हा करिष्मा दाखवला. 

दिल्लीच्या संघाला रोखण्यासाठी MIकर्णधार रोहित शर्मानं संघात बदल करून मोठा डाव खेळला. मुंबईनं यंदाच्या आयपीएलमध्ये १५ विकेट्स घेणाऱ्या राहुल चहरला बाहेर बसवून जयंत यादवला अंतिम ११मध्ये स्थान दिले. दिल्लीच्या संघात डावखुरे फलंदाज अधिक असल्यानं हा बदल केल्याचे रोहितनं सांगितलं. मार्कस स्टॉयनिस व शिखर धवन हे सलामीला आले आणि ट्रेंट बोल्टनं पहिल्याच चेंडूवर स्टॉयनिसला यष्टिरक्षक क्विंटन डी'कॉकला माघारी पाठवून दिल्लीला मोठा धक्का दिला. ट्रेंट बोल्टनं DCला आणखी एक धक्का देताना अजिंक्य रहाणेला ( २) बाद केले. 

ट्रेंट बोल्टनं पॉवर प्लेमध्ये दोन विकेट्स घेत मिचेल जॉन्सनच्या २०१३च्या विक्रमाशी बरोबरी केली. पहिल्या सहा षटकांत सर्वाधिक १६ विकेट्स घेण्याचा विक्रम नावावर केला. शिवाय आयपीएलच्या फायनलमध्ये प्रथमच पहिल्या चेंडूवर विकेट घेण्याचा प्रसंग घडला. फायनलमध्ये अंतिम ११मध्ये स्थान मिळवलेल्या जयंत यादवला ( Jayant Yadav) चौथे षटक दिले आणि त्यानं त्या षटकात शिखर धवनला ( १५) बाद केले. पण, कर्णधार श्रेयस अय्यरनं कोणताही दबाव न घेता मुंबईच्या गोलंदाजांचा सामना केला आणि त्याला रिषभ पंतकडूनही दमदार साथ मिळाली. या दोघांनी दिल्लीची घसरलेली गाडी पुन्हा रुळावर आणली. 

रिषभनं ३५ चेंडूंत यंदाच्या आयपीएलमधील पहिले अर्धशतक झळकावले. नॅथन कोल्टर नायलच्या सलग दोन चेंडूवर चौकार मारणारा रिषभ १५व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर बाद झाला. रिषभनं ३८ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारासह ५६ धावा केल्या. रिषभच्या विकेटनं श्रेयस अय्यरसोबतची त्याची ९६ धावांची भागीदारी संपुष्टात आली. श्रेयसनंही ४० चेंडूंत अर्धशतक पूर्ण करताना दिल्लीचा डाव सावरला. ट्रेंट बोल्टनं ४ षटकांत ३० धावा देत ३ विकेट्स घेतल्या. दिल्लीनं २० षटकांत ७ बाद १५६ धावा केल्या. श्रेयसनं ५० चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह नाबाद ६५ धावा केल्या.

Web Title: IPL 2020 Final MI vs DC: DC finish with 156/7 from their 20 overs, Shreyas Iyer and Rishabh Pant score half century

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.