मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) इंडियन प्रीमिअर लीगमधील ( IPL 2020) सर्वात यशस्वी संघ का आहे, याची प्रचिती पुन्हा एकदा आली. आयपीएलच्या पाच अंतिम सामन्यांचा अनुभव असलेल्या MIनं दुबईत झालेल्या IPL2020च्या फायनलमध्ये दिल्ली कॅपिटल्सवर ( Delhi Capitals) निर्विवाद वर्चस्व गाजवलं. एक फरफेक्ट सांघिक खेळ करताना मुंबई इंडियन्सनं ऐतिहासिक पाचव्यांदा आयपीएलचा चषक उंचावला. यापूर्वी मुंबईनं २०१३, २०१५, २०१७ आणि २०१९ या वर्षांत जेतेपद पटकावले. आयपीएल जेतेपद कायम राखणारा चेन्नई सुपर किंग्सनंतर ( २०१०-२०११) तो दुसरा संघ ठरला.
मार्कस स्टॉयनिस, शिखर धवन आणि अजिंक्य रहाणे हे झटपट माघारी परतल्यानं दिल्लीची अवस्था ३ बाद २२ धावा अशी झाली होती. पण, कर्णधार श्रेयस अय्यरनं कोणताही दबाव न घेता मुंबईच्या गोलंदाजांचा सामना केला आणि त्याला रिषभ पंतकडूनही दमदार साथ मिळाली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ९६ धावा जोडल्या. रिषभनं ३८ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारासह ५६ धावा केल्या. श्रेयसनं ५० चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह नाबाद ६५ धावा केल्या. ट्रेंट बोल्टनं ४ षटकांत ३० धावा देत ३ विकेट्स घेतल्या. दिल्लीनं २० षटकांत ७ बाद १५६ धावा केल्या.
समोर माफक लक्ष्य असताना मुंबईच्या सलामीवीरानं आक्रमक सुरुवात केली. आर अश्विनच्या पहिल्याच षटकात रोहित शर्मानं खणखणीत षटकार खेचून त्याचे मनसूबे स्पष्ट केले. क्विंटन डी'कॉक आणि रोहित यांनी पहिल्या विकेटसाठी ४५ धावा जोडल्या. मार्कस स्टॉयनिसनं पहिल्याच चेंडूवर क्विंटनला ( २०) बाद केले. मुंबईनं पहिल्या पॉवर प्लेमध्ये १ बाद ६१ धावा केल्या. आयपीएल फायनलमधील पॉवर प्लेमधील ही सर्वोत्तम खेळी ठरली. यापूर्वी मुंबईनं २०१५च्या फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध १ बाद ६१ धावा केल्या होत्या. रोहित शर्मानं या दमदार खेळीसह मुंबई इंडियन्सकडून ४००० धावा करण्याचा पहिला मान पटकावला.
मुंबईनं १० षटकांत १ बाद ८८ धावा केल्या आणि त्यांना अखेरच्या १० षटकांत विजयासाठी ६० चेंडूंत ६९ धावा हव्या होत्या. पण, ११व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर रोहित व सूर्यकुमार यादव यांच्यात ताळमेळ चूकला अन् रोहितची विकेट वाचवण्यासाठी सूर्यानं स्वतःला रन आऊट करून घेतले. रोहितला त्याचे दुःख नक्की वाटले. रोहितनं ३६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. आयपीएलच्या अंतिम सामन्यात दोन अर्धशतकी खेळी करणारा तो पहिलाच कर्णधार ठरला. यापूर्वी त्यानं २०१५च्या फायनलमध्ये ५० धावा केल्या होत्या. रोहित ५१ चेंडूंत ५ चौकार व ४ षटकारासह ६८ धावा करून माघारी परतला. त्यानंतर विजयासाठीच्या आवश्यक धावा अन्य फलंदाजांनी सहज केल्या. मुंबईनं ५ विकेट्स राखून सामना जिंकला आणि पाचव्यांदा आयपीएल जेतेपदावर नाव कोरलं.
Read in English
Web Title: IPL 2020 Final MI vs DC: Mumbai Indians beat Delhi Capitals by 5 wickets in the final of IPL 2020 and won the 5th title
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.