इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) १३व्या पर्वाचा अंतिम सामन्यात अनुभवी मुंबई इंडियन्सने ( Mumbai Indians) पहिल्या सत्रात वर्चस्व गाजवले. दिल्ली कॅपिटल्सच्या ( Delhi Capitals) कर्णधार श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) आणि रिषभ पंत ( Rishabh Pant) यांच्या दमदार खेळीनं सर्वांना मंत्रमुग्ध केलं. ३ बाद २२ अशा अडचणीत सापडलेल्या DCला श्रेयस व रिषभ या जोडीनं सावरलं. पण, त्यांना मुंबई इंडियन्ससमोर तगडं आव्हान उभ करता आलं नाही. ट्रेंट बोल्टनं ( Trent Boult) आज पुन्हा करिष्मा दाखवला.
मार्कस स्टॉयनिस, शिखर धवन आणि अजिंक्य रहाणे हे झटपट माघारी परतल्यानं दिल्लीची अवस्था ३ बाद २२ धावा अशी झाली होती. पण, कर्णधार श्रेयस अय्यरनं कोणताही दबाव न घेता मुंबईच्या गोलंदाजांचा सामना केला आणि त्याला रिषभ पंतकडूनही दमदार साथ मिळाली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ९६ धावा जोडल्या. रिषभनं ३८ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारासह ५६ धावा केल्या. श्रेयसनं ५० चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह नाबाद ६५ धावा केल्या. ट्रेंट बोल्टनं ४ षटकांत ३० धावा देत ३ विकेट्स घेतल्या. दिल्लीनं २० षटकांत ७ बाद १५६ धावा केल्या.
समोर माफक लक्ष्य असताना मुंबईच्या सलामीवीरानं आक्रमक सुरुवात केली. आर अश्विनच्या पहिल्याच षटकात रोहित शर्मानं खणखणीत षटकार खेचून त्याचे मनसूबे स्पष्ट केले. क्विंटन डी'कॉक आणि रोहित यांनी पहिल्या विकेटसाठी ४५ धावा जोडल्या. मार्कस स्टॉयनिसनं पहिल्याच चेंडूवर क्विंटनला ( २०) बाद केले. मुंबईनं पहिल्या पॉवर प्लेमध्ये १ बाद ६१ धावा केल्या. आयपीएल फायनलमधील पॉवर प्लेमधील ही सर्वोत्तम खेळी ठरली. यापूर्वी मुंबईनं २०१५च्या फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध १ बाद ६१ धावा केल्या होत्या.
रोहित शर्मानं या दमदार खेळीसह मुंबई इंडियन्सकडून ४००० धावा करण्याचा पहिला मान पटकावला.