मुंबई : यंदाच्या आयपीएलसाठी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स सर्वात महागडा खेळाडू ठरला. कोलकाता नाईट रायडर्सने (केकेआर) त्याला तब्बल १५.५ कोटी रुपयांच्या किमतीमध्ये आपल्या ताफ्यात घेतले. सध्या केकेआरच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी न्यूझीलंडचा माजी धडाकेबाज फलंदाज आणि कर्णधार ब्रेंडन मॅक्क्युलम याच्याकडे आहे. मॅक्क्युलम संघाचा प्रशिक्षक असल्याचा मोठा आनंद कमिन्सला आहे. कारण आता त्याला मॅक्क्युलविरुद्ध बॉलिंग करावी लागणार नाही.
कमिन्सने २०१७ नंतर आयपीएलमध्ये पुनरागमन केले. याआधी तो दिल्ली डेअरडेव्हिल्स संघात होता, तसेच त्याआधी २०१४-१५ मोसमात त्याने केकेआरकडून सहभाग घेतला होता. गेल्या काहीवर्षातील त्याच्या गोलंदाजीची वाढलेली धार पाहून केकेआरने यंदा त्याच्यासाठी सर्वाधिक बोली लावली. केकेआरसाठी कमिन्स यंदा ट्रम्प कार्ड ठरेल यात वाद नाही.
त्याचवेळी, आता तो मुख्य प्रशिक्षक मॅक्क्युलमच्या मार्गदर्शनाखाली कामगिरी करेल. याबाबत कमिन्सने केकेआर वेबसाईटवर सांगितले की, ‘मी खूप नशीबवान आहे की, आता मला मॅक्क्युलमविरुद्ध गोलंदाजी करावी लागणार नाही. कारण तो सर्वात धोकादायक आणि स्फोटक फलंदाजांपैकी एक आहे. सामन्यातील पहिले चेंडू असले, तरी तो तुमच्या दिशेने निडरपण चालून येत, तुमच्या डोक्यावरुन षटकार मारु शकतो. त्यामुळेच मॅक्क्युलम यंदा एक प्रशिक्षक म्हणून माझ्या संघात असल्याचा मला खूप आनंद आहे.’
‘खरं म्हणजे, जेव्हा तो न्यूझीलंडचा कर्णधार होता, तेव्हापासून मला त्याचा खेळ आवडायचा. तसेच आयपीएलमध्येही अनेकदा त्याच्याविरुद्ध खेळताना त्याचा खेळ जवळून अनुभवला. ज्याप्रकारे तो आपली कामगिरी पार पाडतो, ते मला खूप आवडतं. तो निडर आहे, त्याला कायम आपली छाप पाडायची असते, अखेरपर्यंत लढण्याची त्याची तयारी असते आणि नेहमीच तो सकारात्मक मानसिकतेने विचार करत असतो,’ असेही कमिन्सने सांगितले.
Web Title: IPL 2020: Good luck! doesn’t have to bowl to McCullum ; Saying the most expensive bowler Pat Cummins
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.