मुंबई: चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Superkings) संघाने शुक्रवारी Indian Premier League (IPL 2020) मध्ये सलग दुसरा पराभव पत्करला. दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना त्यांच्या फलंदाजांना नियोजनबद्ध खेळ करण्यात यश आले नाही. एकटा फाफ डूप्लेसिस सोडला, तर बाकी कोणालाही निर्धाराने खेळता आले नाही. त्यात त्यांना आपल्या अनुभवी फलंदाजाची कमतरता फार भासली. मात्र आता त्या स्टार फलंदाजाचे पुनरागमन होत असून चेन्नई आता लवकरच विजयी मार्गावर परतेल असा विश्वास चाहत्यांना आहे.
दिल्लीने १७५ धावा उभारल्यानंतर चेन्नईला सुरुवातीपासून आवश्यक धावगती राखण्यात यश आले नाही. वरच्या स्थानावर फलदाजीला आलेला कर्णधार महेंद्रसिंग धोनीही फार काही करु शकला नाही. अनुभवी फाफ डूप्लेसिस (४३) याने एकाकी झुंज दिली. त्याला दोनवेळा जीवदानही मिळाले, मात्र याचा फायदा तो घेऊ शकला नाही. फलंदाजांकडून झालेल्या अपयशी कामगिरीमुळेच संघाला पराभव पत्करावा लागल्याचे कर्णधार धोनीनेही मान्य केले.
परंतु, आता चेन्नई संघाची पुन्हा एकदा विजयी मार्गावरुन वाटचाल होण्याची शक्यता बळावली आहे. कारण गेल्या दोन सामन्यांत दुखापतीमुळे संघाबाहेर बसलेला स्टार फलंदाज अंबाती रायुडू (Ambati Rayudu) पुढील सामन्यात खेळण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. दिल्लीविरुद्ध सीएसकेला रायुडूची कमतरता खूप भासली.
दिल्लीविरुद्धच्या पराभवानंतर धोनीने सांगितले की, ‘टॉप ऑर्डरला वेगवान सुरुवात न मिळाल्याने पुढील रणनिती आखताना दडपण आले. पण आता पुढील सामन्यासाठी रायुडूच्या पुनरागमनाने टीमचे संतुलन राखण्यात मदत होईल.’ आयपीएलच्या सलामीच्याच सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी मुंबई इंडियन्सविरुद्धच्या विजयात रायुडूची कामगिरी निर्णायक ठरली होती. त्याने 71 धावांची जबरदस्त खेळी करत संघाला विजयी केले होते. मात्र यानंतर दुखापतीमुळे तो पुढील दोन सामन्यांत खेळू शकला नव्हता आणि हे दोन्ही सामने चेन्नईने गमावले होते. परंतु आता 2 ऑक्टोबरला होणाऱ्या चेन्नईच्या चौथ्या सामन्यात रायुडू खेळणार असल्याचे निश्चित झाले आहे.