मुंबई : यंदाच्या Indian Premier League (IPL 2020) मध्ये मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) सलग आठव्यांदा पराभवाने सुरुवात झाली. पहिल्याच सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी चेन्नई सुपरकिंग्जकडून (Chennai Superkins) मुंबईकरांना पराभव पत्करावा लागला होता. मात्र त्यानंतर मुंबईने टॉप गिअर टाकताना आपली गाडी सुसाट पळवली आणि आता तर त्यांनी गुणतालिकेत थेट अव्वल स्थानी कब्जा केला. यानंतर मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर मराठीमध्ये ‘आता कसं वाटतंय’ अशी पोस्ट केली आणि यावर चाहत्यांनी तुफान लाईक्स करताना अक्षरश: कल्ला केला.
रविवारी झालेल्या दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यातून मुंबईकरांनी यंदाच्या सत्रातील सलग चौथ्या विजयाची नोंद केली. या शानदार कामगिरीसह मुंबईने पुन्हा एकदा गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. दिल्लीने १६२ धावांची मजल मारल्यानंतर मुंबईने १९.४ षटकांतच ५ बाद १६६ धावा केल्या. कर्णधार रोहित शर्मा लवकर बाद झाल्यानंतर क्विंटन डीकॉक (५३) आणि सूर्यकुमार यादव (५३) यांनी अर्धशतकी खेळी करताना मुंबईला सावरले. ईशान किशननेही लहान, परंतु महत्त्वाची आक्रमक खेळी केली. दिल्लीच्या कागिसो रबाडाने २ बळी घेत सातत्य राखले, मात्र त्याचा फायदा दिल्लीला झाला नाही.
या सामन्यानंतर संघाचे अव्वल स्थान निश्चित झाले आणि मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावरील आपल्या सर्व प्रोफाईलमध्ये मराठीमध्ये पोस्ट केली की, ‘आता कसं वाटतंय..’ यावर मुंबईच्या समर्थकांनी अक्षरश: कल्ला केला. ‘लय मस्त वाटतंय’, ‘जाम भारी वाटतंय’, ‘लय गार गार वाटतंय,’ असे पोस्ट करत चाहत्यांनी मुंबई इंडियन्सच्या विजयाचा आणि अव्वल स्थानाचा जल्लोष केला. गेल्या काही सामन्यांपासून मुंबई इंडियन्स सातत्याने मराठी भाषेतून पोस्ट करत असून चाहत्यांकडूनही त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबई इंडियन्सने माजी गोलंदाज झहीर खान युवा गोलंदाज दिग्विजय देशमुखला मराठीमधून टीप्स देत असल्याचा व्हिडिओ पोस्ट केला होता. यावरही चाहत्यांनी अनेक लाईक्स आणि कमेंट्स केल्या होत्या.